नागपूर : पशुवैद्यकीय शास्त्राच्या क्षेत्रात स्वायत्त आणि स्वतंत्र पशुवैद्यकीय परिषदेची स्थापना करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपूर येथे केले. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. भागवत म्हणाले की, ज्याचे काम त्यानेच केलेले चांगले असते. क्रीडा क्षेत्रात जसे खेळाडूंची आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे प्राणी विज्ञानासारख्या गुंतागुंतीच्या क्षेत्रात संबंधित ज्ञान आणि अनुभव असलेल्या तज्ज्ञांकडे निर्णयप्रक्रिया असणे आवश्यक आहे. “फक्त तज्ज्ञांनाच निर्णय घेण्याचा अधिकार असावा. विशिष्ट काम संबंधित तज्ज्ञांकडे सोपवले नाही तर काम बिघडण्याची शक्यता असते,” असे ते म्हणाले.
प्राण्यांचे सखोल आकलन आणि त्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांचे प्रभावी निराकरण करण्यासाठी पशुवैद्य आणि पशुवैद्यकीय शास्त्राचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, या क्षेत्रातील तज्ज्ञांचे सहकार्य सर्व स्तरांवर मिळणे गरजेचे आहे. “आपण पशुवैद्य आहो म्हणून हे मत मांडत नाही, तर ज्या क्षेत्रांमध्ये योग्य आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या हाती जबाबदारी दिली जाते ती क्षेत्रे झपाट्याने प्रगती करतात, हा अनुभव आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
पशुवैद्यकीय क्षेत्रात सुधारणा, धोरणनिर्मिती आणि कार्यक्षम अंमलबजावणी यासाठी समर्पित व स्वतंत्र परिषद स्थापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या माध्यमातून पशु आरोग्य सेवा, व्यवस्थापन संरचना आणि व्यावसायिक मानदंड अधिक प्रभावी करण्यावर भर देण्यात यावा, असे आवाहन त्यांनी केले.