आमची शिरे कापली गेली तरी आम्ही राष्ट्रगीताच्या उर्वरित चार कडवी गाणार नाही- मौलाना साजिद रशिदी

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने राष्ट्रगीत ‘वंदे मातरम’ संदर्भात नवे मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यानुसार वंदे मातरमला राष्ट्रगान ‘जन-गण-मन’ प्रमाणेच सन्मान देणे अनिवार्य करण्यात आले आहे. नव्या प्रोटोकॉलनुसार सर्व सरकारी कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताचे सर्व सहा कडवे वाजवणे किंवा गाणे बंधनकारक असेल. यावरून आता काही मुस्लिम नेते विरोधात उतरले आहेत. ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना साजिद रशीदी यांनी वंदे मातरमची सर्व कडवी गाण्याला विरोध दर्शवला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, आमची शिरे कापली गेली तरी आम्ही राष्ट्रगीताच्या त्या विशिष्ट ओळी (उर्वरित चार कडवी) गाणार नाही.

राष्ट्रगीतापूर्वी वंदे मातरमचे सर्व सहा कडवी म्हणणे अनिवार्य करण्याबाबत मौलाना साजिद रशीदी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, वंदे मातरम १९३७ पासूनच वादग्रस्त राहिले आहे. १९३७ मध्ये त्या वेळचे प्रमुख नेते, जसे अबुल कलाम आझाद आणि हुसेन अहमद मदनी यांनी काँग्रेसला पत्र लिहून सांगितले होते की, वंदे मातरममधील काही ओळी आमच्या (मुस्लिम समाजाच्या) धार्मिक श्रद्धांच्या विरोधात आहेत. त्यानंतर काँग्रेसने ठराव मंजूर करून वंदे मातरममधील काही ओळी वगळल्या.

ते पुढे म्हणाले की, २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयात असे म्हटले होते की, जर कोणी वंदे मातरमच्या पठणावेळी उभे राहत नाही, तर त्याला देशद्रोही मानले जाऊ शकत नाही. माझ्या मते, राष्ट्रगीताच्या त्या ओळी ज्यामध्ये देशाला ‘माता दुर्गा’ आणि ‘माता सरस्वती’ असे संबोधले आहे, त्या आमच्या धार्मिक श्रद्धांच्या विरोधात आहेत. मुस्लिम आपले प्राण देऊ शकतात, पण आपल्या धार्मिक श्रद्धांशी तडजोड करू शकत नाहीत. आमची शिरे कापली गेली तरी आम्ही राष्ट्रगीताच्या त्या विशिष्ट ओळी म्हणणार नाही. जर कोणी आमच्यावर हा आदेश लादण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही ते सहन करणार नाही. मुस्लिम राष्ट्रगीताच्या त्या विशिष्ट ओळी म्हणणार नाहीत.

दरम्यान, एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी म्हटले की, “मी वंदे मातरम्‌चा आदर आणि सन्मान करतो, पण वंदे मातरम्‌ बोलणे आम्हाला बंधनकारक आहे असे सांगणे असंवैधानिक आहे. भाजप आणि आरएसएस असे म्हणतात की, जर तुम्ही वंदे मातरम्‌ म्हटले नाही तर तुम्ही देशविरोधी आहात. हे चुकीचे आहे. आम्ही राष्ट्रीयगीत आनंदाने म्हणतो. त्यांनी सर्व मुद्द्यांवरून लक्ष विचलित केले आहे.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech