मुंबई : मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपीक राजेंद्र ढेरंगे लाच घेताना रंगेहाथ सापडल्याप्रकरणी मंत्री नरहरी झिरवळ यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. या घटनेबाबत मला सुस्पष्ट कल्पना नव्हती, असे सांगत त्यांनी हा प्रकार अत्यंत दयनीय आणि मंत्रालयाला कलंक लावणारा असल्याचे म्हटले. माझे कार्यालय आणि विभागाचे कार्यालय मंत्रालयात जवळ असले तरी प्रत्येक अधिकाऱ्याच्या कामकाजावर लक्ष ठेवण्याचा प्रसंग येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
झिरवळ यांनी सांगितले की, या प्रकरणी लिपीक राजेंद्र ढेरंगे यांच्याविरुद्ध तात्काळ चौकशीचे आदेश देण्यात आले असून सध्या ते पोलीस कोठडीत आहेत. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून गोपनीय अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. अहवालानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या राजीनाम्याबाबत विचारले असता, कुणाला मंत्रिपद द्यायचे किंवा काढायचे हा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असल्याचे झिरवळ म्हणाले. अद्याप मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा झालेली नसून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपले कोणाशीही वैर नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजेंद्र ढेरंगे हे अन्नपुरवठा विभागाचे कर्मचारी असून अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते. त्यांना मूळ विभागात परत पाठवण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाला पत्र देण्यात आल्याची माहिती झिरवळ यांनी दिली. विभागात नियमित सुनावण्या, निलंबन व परवाना प्रक्रियेची कामे नियमाप्रमाणे सुरू होती आणि कोणावरही बळजबरी करण्यात आलेली नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच ढेरंगे यांनी लाच स्वतःसाठी घेतल्याची कबुली दिली असून कोणत्याही ओएसडीचा सहभाग असल्याचे त्यांनी सांगितलेले नाही, असेही झिरवळ यांनी स्पष्ट केले.