मुंबई : टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान करून नवा वाद ओढवून घेणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंगळवारी याप्रकरणी अखेर दिलगिरी व्यक्त केली. भाजपच्या गलिच्छ खोडसाळपणामुळे काही शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी मनःपूर्वक खेद व्यक्त करतो. माझ्या शब्दाचा गैरवापर केल्याबद्दल शिवप्रेमींप्रती दिलगीरी व्यक्त करतो. कोणाच्याही भावनांना ठेच पोहोचवण्याचा माझा हेतू नव्हता, असे सपकाळ यांनी आज एक्स या समाज माध्यमात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मालेगाव महापालिकेच्या उपमहापौरांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावले आहे. या छायाचित्रावरून सध्या बाद उद्भवला आहे. यासंदर्भात प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ यांनी टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितले पाहिजे, असे विधान केले. या विधानावरून सपकाळ यांच्यावर भाजपकडून प्रचंड टीका सुरू आहे. भाजपच्या एका आमदाराने सपकाळ यांची जीभ कापण्यासाठी बक्षीस जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर सपकाळ यांनी आपल्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे.
माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास करण्यात आला. सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घालण्यात आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण करण्यात आला. भाजप आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला. त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न झाला हे आपण पुण्यात पाहिले आहे, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम अद्वितीय आहे. ते माझे आदर्श, प्रेरणास्थान आणि स्वाभिमान आहेत. त्यांच्या तुलनेचा प्रश्नच उद्भवत नाही. टिपू सुलतानांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इंग्रजाविरूद्ध लढा दिल्याचे मी म्हटले होते. त्यांच्या योगदानाची दखल घेत थेट भारताच्या संविधानामध्ये देखील त्यांची तसबीर आहे. त्यांच्या प्रतिमेच्या संदर्भात समाजात तणाव वाढू नये, सर्वांनी परस्पर सन्मान आणि बंधुभाव जपावा, हा माझ्या वक्तव्याचा गाभा होता. इतिहासावर मतभेद असू शकतात; मात्र त्यावर संयत, अभ्यासपूर्ण चर्चा व्हावी आणि समाजात संघर्ष निर्माण होऊ नये. जात-धर्म-पंथावर ध्रुवीकरण अजिबात खपवून घेता कामा नये,हीच भूमिका मी मांडली होती, असे स्पष्टीकरणही सपकाळ यांनी केले आहे.