बसपा २०२७ च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार – मायावती

0

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी बुधवारी घोषणा केली की त्यांचा पक्ष २०२७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवेल. कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही. त्यांनी सांगितले की युती बसपाला नुकसान पोहोचवते. त्यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिशाभूल करणाऱ्या बातम्यांकडे दुर्लक्ष करून पक्षाला बळकटी देण्याचे आवाहन केले. बसपा प्रमुख मायावती यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की २०२७ ची उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक बसपा युतीकरून लढणार आहेत. त्यांनी ही बातमी पूर्णपणे खोटी व दिशाभूल करणारी असल्याचे सांगितले. ही फेक न्यूज पक्ष कार्यकर्ते व जनतेला गोंधळात टाकण्यासाठी पसरवली जात आहे, असे त्यांनी म्हटले. हे सर्वस्वी चुकीचे, असत्य आणि मनगढंत आहे. अशा परिस्थितीत, नेत्यांसोबतच, माध्यमांनीही तुटलेल्या पतंगासारखे उडवून स्वतःला मूर्ख बनवण्याचे टाळले पाहिजे.असा टोला त्यांनी लगावला.

मायावती पुढे म्हणाल्या की त्यांनी एकदाच नव्हे तर प्रत्येक पक्ष बैठकीत आणि अगदी गेल्या ९ ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे आयोजित विराट सभेतही उघडपणे जाहीर केले होते की बसपा स्वबळावर निवडणूक लढवेल. तरीदेखील काही लोक आणि काही माध्यमे अशा घाणेरड्या कटकारस्थानात अडकून चुकीच्या बातम्या पसरवत आहेत, ज्यामुळे त्यांचा वेळ आणि प्रतिमा दोन्ही वाया जात आहेत. जनतेने अशा बातम्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे, असे त्यांनी सांगितले. म्हणाल्या की बसपाचे कार्यकर्ते २०२७ च्या मिशनसाठी पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने काम करत आहेत. त्यांच्या लक्षात व्यत्यय आणण्यासाठी अशा प्रकारच्या अफवा आणि कट रचले जात आहेत. पक्ष पदाधिकाऱ्यांना त्यांनी आवाहन केले की अशा मनगढंत गोष्टींकडे अजिबात लक्ष देऊ नये आणि “हत्तीच्या मस्त चालीनं” पुढे जात राहावे. २००७ प्रमाणेच स्वबळावर निवडणूक लढवून पुन्हा एकदा बसपाचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन करावे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिल्लीमध्ये त्यांना प्रोटोकॉलनुसार आणि सुरक्षा कारणास्तव देण्यात आलेल्या टाइप-८ सरकारी बंगल्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी स्पष्ट केले की हा बंगला त्यांना सुरक्षा आणि शासकीय नियमांनुसार वाटप करण्यात आला आहे. याबाबत चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती पसरवणे अयोग्य आहे. बसपा प्रमुख म्हणाल्या की निवडणुका जसजशा जवळ येतील, तसतसे विरोधकांचे ‘साम, दाम, दंड, भेद’ यांसारखे डावपेच आणि बसपाला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न अधिक वाढतील, जसे पूर्वीही होत आले आहे. त्यामुळे केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या आपल्या एकमेव पक्षावर आणि त्याच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा. बाबासाहेबांच्या आत्मसन्मान आणि स्वाभिमानाच्या चळवळीला बळकटी देण्यासाठी मिशनरी भावनेने तन, मन आणि धनाने कार्यरत राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी शेवटी नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech