लखनऊ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी शुक्रवारी सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरुद्ध २०१८ च्या मानहानीच्या खटल्यासाठी हजर झाले. यावेळी राहुल गांधींनी आपली बाजू मांडताना सांगितले कि. “स्वस्त लोकप्रियतेसाठी माझ्यावर कट रचून हा खटला दाखल करण्यात आला आहे.”
एमपी-एमएलए न्यायालयात आज, शुक्रवारी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ३१३ अंतर्गत राहुल गांधी यांचा जबाब नोंदविण्यात आला. सुमारे २७ मिनिटे त्यांनी न्यायाधीशांसमोर आपली बाजू मांडली. “स्वस्त लोकप्रियतेसाठी माझ्यावर कट रचून हा खटला दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भातील पुरावे लवकरच न्यायालयासमोर सादर करीन,” असे त्यांनी सांगितले. यावर पुढील सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. न्यायालयाबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यापूर्वीच्या सुनावणीला राहुल गांधी हजर राहिले नव्हते. त्यांच्या वतीने अधिवक्ता काशी प्रसाद शुक्ल यांनी ते केरळमध्ये असल्याचे नमूद करत मुदतवाढ मागितली होती.
कर्नाटकातील पत्रकार परिषदेदरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याबाबत राहुल गांधी यांनी कथितरीत्या अपमानास्पद वक्तव्य केले होते. या संदर्भात जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात दिवाणी मानहानीचा दावा दाखल केला होता. त्या प्रकरणाची सुनावणी सध्या सुरू आहे. या प्रकरणात राहुल गांधी २६ जुलै २०२४ रोजी न्यायालयात हजर झाले होते. त्यानंतर ते सुनावणीच्या तारखांना अनुपस्थित राहिले. १९ जानेवारी रोजी ते हजर न राहिल्याने न्यायालयाने त्यांना २० फेब्रुवारी रोजी वैयक्तिकरित्या हजर राहण्याचे आदेश दिले होते.