भिवंडीत काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचा बंडखोर बनला महापौर

0

उपमहापौरपदी मोमीन तारिक बारी|

भिवंडी : भिवंडी महानगरपालिकेतील महापौरपदाची बहुचर्चित निवड अखेर पार पडली असून सेक्युलर फ्रंटचे पुरस्कृत उमेदवार आणि भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांनी स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला आहे. स्व. विलासराव देशमुख सभागृहात दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या प्रक्रियेत हात वर करून मतदान घेण्यात आले. या निवडणुकीत चौधरी यांना ४८ मते मिळाली, तर शिवसेना (शिंदे गट)चे विलास पाटील यांना २५ आणि भाजपच्या स्नेहा पाटील यांना १६ मते मिळाली. एका अपक्ष सदस्याची अनुपस्थिती नोंदवण्यात आली. दोन वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर झालेल्या या निवडणुकीत सुरुवातीला दहा नामनिर्देशन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी सहा उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम लढत त्रिकोणी झाली. भाजपमधील बंडखोरीमुळे ऐनवेळी राजकीय समीकरणे बदलली. नारायण चौधरी हे मूळचे भाजपचे नेते असून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) समर्थित सेक्युलर फ्रंटमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना अधिकृत उमेदवार घोषित करत पक्षादेशही जारी केला. सेक्युलर फ्रंटच्या एकजुटीचा फायदा चौधरी यांना झाला आणि त्यांनी भाजपला मोठा धक्का दिला.

भिवंडी महापालिकेच्या स्व. विलासराव देशमुख सभागृहात महापौर आणि उप महापौर पदाची निवडणूक पार पडली. या सभेत ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम केले. पांचाळ यांनी निवडणूकिसाठी सर्व उमेदवारांचे अर्ज वैध ठरवले आणि अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. नारायण चौधरी यांनी दोन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एक अर्ज त्यांनी मागे घेतला. त्यांच्यासह तारीक मोमीन जावेद दळवी, सुचिता म्हात्रे, बाळाराम चौधरी, मयुरेश पाटील आणि प्रतिभा पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली. मतदान प्रक्रियेदरम्यान विलास पाटील न्यायालयीन कोठडीत असल्याने सभागृहात उशिरा पोहोचले, तरी प्रक्रिया नियोजित वेळेनुसार पार पडली. निकाल जाहीर होताच सभागृहात चौधरी समर्थकांनी जल्लोष केला. मूळचे शेतकरी असलेले आणि बांधकाम व्यवसायातून राजकारणात आलेले नारायण चौधरी यांनी २४ वर्षांच्या राजकीय प्रवासानंतर महापौरपदावर शिक्कामोर्तब केले आहे.

दरम्यान, उपमहापौरपदी मोमीन तारिक बारी यांची ४३ मतांनी निवड झाली. महायुतीकडे बहुमत असल्याचे चित्र असतानाही अंतर्गत नाराजी आणि बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सत्ता समीकरणात मोठा उलटफेर झाला आहे. भिवंडीतील ही निवडणूक आगामी स्थानिक राजकारणासाठी दिशादर्शक ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महापौरपदासाठी कोणार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील, त्यांचे सुपुत्र अ‍ॅड. मयुरेश विलास पाटील तसेच माजी महापौर प्रतिभा पाटील, भिवंडी विकास आघाडीचे जावेद दळवी, काँग्रेसचे तारीक मोमीन, भाजपकडून नारायण चौधरी आणि स्नेहा मेहुल पाटील, तर शिवसेनेकडून बाळाराम चौधरी आणि सुचिता रुपेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech