नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय एआय शिखर परिषदे दरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. काँग्रेसच्या या आंदोलनाला भाजपने देशविरोधी कृत्य ठरवले आहे. भाजपने आरोप केला की राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्थळी अर्धनग्न अवस्थेत गोंधळ घातला. हा प्रकार जागतिक मंचावर भारताला लज्जित करण्यासाठीच करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. भारत एक प्रतिष्ठित जागतिक एआय परिषद आयोजित करत असताना, तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष आणि नेतृत्व प्रदर्शित करत असताना काँग्रेसने सन्मानाऐवजी अडथळ्याचा मार्ग निवडला, असा आरोप भाजपने केला.
भाजप नेते संबित पात्रा यांनी या आंदोलनावर टीका करताना म्हटले की काँग्रेसने देशाला लज्जित करण्यासाठी हे कृत्य केले आहे. हा प्रकार काँग्रेसच्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आंदोलन योगायोग नव्हे तर काँग्रेसचा प्रयोग आहे. देशाची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचे पात्रा यांनी सांगितले. संबित पात्रा म्हणाले की काही आंदोलनकर्ते बारकोडच्या साहाय्याने कार्यक्रमात प्रवेशले होते आणि निषेध दर्शवण्यासाठी त्यांनी टी-शर्ट उलटी घातली होती. हा अचानक घडलेला प्रकार नसून, पूर्वनियोजित रणनीतीचा भाग असल्याचा त्यांचा दावा आहे. तसेच या संपूर्ण घटनेची योजना राहुल गांधी यांच्या निवासस्थानी, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांच्या उपस्थितीत आखण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही यूथ काँग्रेसच्या आंदोलनाची तीव्र शब्दांत निंदा केली. आपल्या ट्विटर संदेशात (एक्स) राजनाथ म्हणाले की, संपूर्ण जग नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेचे आयोजन आणि तंत्रज्ञान-नवोन्मेष क्षेत्रातील भारताचे वाढते जागतिक नेतृत्व पाहत असताना काँग्रेसने देशाचा सन्मान वाढवण्याऐवजी कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा मार्ग निवडला.
कार्यक्रम स्थळी युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले अनुचित वर्तन आणि गोंधळ हा केवळ दुर्दैवी नसून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिष्ठा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसच्या या कृत्याचा मी निषेध करतो, असेही संरक्षण मंत्र्यांनी नमूद केले.भारत जेव्हा जेव्हा जागतिक मंचावर प्रगती करतो, तेव्हा काँग्रेस राष्ट्रहिताऐवजी राजकीय लाभाला प्राधान्य देते, असा आरोप करत राजनाथ सिंह म्हणाले की पक्षीय राजकारण देशाच्या प्रतिष्ठेपेक्षा वर ठेवणे अत्यंत खेदजनक आहे. भारताची जनता कोण देशाला सक्षम आणि समर्थ बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि कोण वारंवार देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे राजनाथ म्हणाले.