सौदी अरेबियावरील हल्ल्यात भारतीयाचा मृत्यू नाही, भारतीय दूतावासाने केले स्पष्ट

0

नवी दिल्ली : इराणने रविवारी सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात निवासी भागात एक प्रोजेक्टाइल पडल्याने सुरुवातीला एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र रियाधमधील भारतीय दूतावासाने सोमवारी स्पष्ट केले की या हल्ल्यात कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही. तसेच त्यांनी सांगितले की आम्ही सौदी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहोत. यापूर्वी सौदी नागरी संरक्षण (सिव्हिल डिफेन्स) अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले होते की अल-खरज शहरात झालेल्या या घटनेत मृत्यू झालेल्या दोन जणांमध्ये एक भारतीय आणि एक बांगलादेशी नागरिक होता. मात्र आता भारतीय दूतावासाने भारतीय नागरिकाच्या मृत्यूची बातमी चुकीची असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले, “काल संध्याकाळी अल-खरज येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत कोणत्याही भारतीय नागरिकाचा मृत्यू झालेला नाही, ही दिलासादायक बाब आहे.” दूतावासाने पुढे सांगितले, “कौन्सुलर अधिकारी श्री वाय. साबिर काल रात्री अल-खरज येथे गेले होते आणि या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्या भारतीय नागरिकाची त्यांनी भेट घेतली.” दूतावासाने पुढे माहिती दिली की सध्या त्या जखमी व्यक्तीवर अल-खरजमधील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, सौदी प्रवक्त्यांनी म्हटले की नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याचे प्रयत्न हे आंतरराष्ट्रीय मानवीय कायद्याचे उघड उल्लंघन आहे आणि अशा प्रकरणांमध्ये निर्धारित प्रक्रिया लागू करण्यात आली आहे. तसेच सौदी अरेबियाने निवेदन जारी करत सांगितले की इराणी हल्ल्यांमुळे देशात संताप वाढत आहे.दरम्यान, भारतीय दूतावासाने रविवारी आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी केली. यात नागरिकांनी सतर्क राहावे आणि सुरक्षा मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच स्थानिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या सूचनांचे प्रामाणिकपणे पालन करण्यास सांगितले आहे. दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “या प्रदेशातील आणि सौदी अरेबियातील सध्याची परिस्थिती लक्षात घेता, सध्या सौदी अरेबियामध्ये असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे,” असे आवाहन करण्यात आले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech