आषाढी एकादशीनिमित्त ‘सन मराठी’चा अनोखा उपक्रम; ‘इच्छा कलश’द्वारे जपली भक्तांची श्रद्धा

0

मुंबई : आषाढी एकादशीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र भक्तिमय वातावरणात रंगला आहे. लाखो वारकरी देहू आणि आळंदीहून विठ्ठलनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. मात्र, विविध कारणांमुळे अनेक भाविकांना या पवित्र वारीत सहभागी होता आलेले नाही. अशा भक्तांच्या श्रद्धेलाही तितकाच मान देत ‘सन मराठी’ वाहिनीने एक अनोखा आणि अर्थपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे.देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या वारी मार्गावरील विविध गावांमध्ये ‘सन मराठी’ची टीम भेट देत आहे. वारीत सहभागी होऊ न शकलेल्या भाविकांना सीड पेपर (बियायुक्त कागद) दिला जात आहे. या कागदावर प्रत्येक जण आपल्या मनातील इच्छा, प्रार्थना किंवा विठुरायाकडे असलेली भावना लिहित आहे. त्यानंतर हे सर्व सीड पेपर एका विशेष ‘इच्छा कलशात’ जमा केले जात आहेत.

‘इच्छा कलश’ या उपक्रमाच्या माध्यमातून वारीत सहभागी होऊ न शकलेल्या भाविकांनाही आपल्या मनातील भावना विठुरायापर्यंत पोहोचवण्याची एक अनोखी संधी मिळत आहे. वारकऱ्यांच्या या इच्छा पंढरपूरच्या पवित्र भूमीत पोहोचवल्या जाणार आहेत. याच भक्तिमय वातावरणात ‘सन मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘सखा माझा पांडुरंग’ मध्ये संत सखुबाई यांची भूमिका साकारणारी अभिनेत्री सान्वी जांभेकर पंढरपुरात जाऊन विठुरायाची महापूजा करणार आहे.

याबाबत अभिनेत्री सान्वी जांभेकर म्हणाली, “हे वर्ष माझ्यासाठी खूप खास आहे. ‘सखा माझा पांडुरंग’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळणं हे माझं भाग्यच आहे. या मालिकेमुळे यंदा मला पहिल्यांदाच पंढरपूरला जाण्याची संधी मिळत आहे आणि त्यासाठी मी खूप उत्सुक आहे. ‘सन मराठी’ने ‘इच्छा कलश’ हा अतिशय सुंदर उपक्रम राबवला आहे. ज्यांना विठुरायाच्या चरणी आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे, त्यांच्यासाठी ही खूप छान संधी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार आणि कठीण प्रसंग येत असतात. पण वारकरी कितीही अडचणी आल्या तरी विठुरायाच्या भेटीसाठी वारी कधीच चुकवत नाही. त्यांची श्रद्धा, भक्ती आणि समर्पण खरंच प्रेरणादायी आहे. आतापर्यंत सोशल मीडिया आणि ‘सन मराठी’च्या माध्यमातून मी वारीचा अनुभव घेतला आहे. पण आता प्रत्यक्ष पंढरपुरात जाऊन विठुरायाच्या नामस्मरणात दंग व्हायचं आहे. मालिकेमुळे दररोज विठ्ठलाचं नाव घेण्याचं भाग्य मला लाभतं, पण आता प्रत्यक्ष विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी माझे डोळे आतुर झाले आहेत.”

‘सन मराठी’च्या या उपक्रमाची आणखी एक खास गोष्ट म्हणजे वापरण्यात येणारा सीड पेपर पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. वारी पूर्ण झाल्यानंतर या सीड पेपरची लागवड करण्यात येणार आहे. भक्तांच्या इच्छा आणि श्रद्धेचे प्रतीक असलेले हे सीड पेपर मातीत रुजतील आणि त्यातून नवीन रोपे उगवतील. अशा प्रकारे भक्ती, श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech