नवी दिल्ली : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोधकांनी आणलेला अविश्वास प्रस्ताव सभागृहात आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला. दोन दिवस चाललेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे आता ओम बिर्ला लोकसभा अध्यक्षपदी कायम राहणार आहेत. विरोधी पक्षांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत अविश्वास प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर लोकसभेत सलग दोन दिवस चर्चा झाली. चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभा अध्यक्षांचे जोरदार समर्थन केले. त्यांनी सांगितले की, अध्यक्षांचे पद पक्षीय राजकारणापेक्षा वरचे आहे आणि त्यांच्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित करणे योग्य नाही. त्याचवेळी त्यांनी विरोधकांवर टीका करत संसदीय नियम आणि परंपरांचे पालन करण्याचे आवाहन केले.
चर्चा संपल्यानंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. आवाजी मतदानाच्या आधारे लोकसभेने हा प्रस्ताव फेटाळून लावला. दरम्यान, अविश्वास प्रस्तावावर आवाजी मतदानानंतर, पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी उद्या (१२ मार्च) सकाळी ११ वाजेपर्यंत सभागृह तहकूब करण्याची घोषणा केली. विरोधकांनी ओम बिर्ला यांच्यावर सभागृहाच्या कामकाजात पक्षपातीपणाचा आरोप करत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधातील हा अविश्वास प्रस्ताव फेब्रुवारीमध्ये मांडण्यात आला होता. या अविश्वास प्रस्तावावर जवळपास ११८ खासदारांनी स्वाक्षरी केली होती. यावरील चर्चेसाठी १० तासांचा कालावधी राखून ठेवण्यात आला होता. त्याप्रमाणे विरोधी पक्षाने ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडला. ५० हून अधिक खासदारांनी बाजूने मतदान केले. त्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी प्रस्ताव मांडण्यास परवानगी दिली.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला. या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये आज चर्चा सुरू आहे. या चर्चादरम्यान सत्ताधारी पक्षाने वारंवार नाव घेतल्यामुळे विरोधी पक्षनेते राहुल गांधी संतापले. राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान गोंधळ घालण्यात आला. यावेळी राहुल गांधी यांनी आरोप केला की, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला सभागृहात बोलण्यापासून रोखले जात आहे. हे सभागृह एका पक्षाचे नाही तर संपूर्ण देशाचे आहे.
यावेळी विरोधकांनी “आपल्याला देश वाचवायचा आहे, आपल्याला मोदींना हटवायचे आहे. मोदी सरकारला लाज वाटली पाहिजे. “मत चोरांनो, सिंहासन सोडा” अशा घोषणा दिल्या. त्यांनी निवडणूक आयोगावर मतांच्या दलालीत सहभागी असल्याचा आरोपही केला. प्रश्नोत्तराच्या तासात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी शेतकरी आणि शेतीशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली. प्रियंका गांधी लोकसभेत म्हणाल्या की, या देशात फक्त एकच व्यक्ती आहे, जी गेल्या १२ वर्षात त्यांच्यापुढे झुकली नाही. ती म्हणजे विरोधी पक्षनेता आणि तो विरोधी पक्षनेता या सभागृहात उभा राहून त्यांना सत्य सांगतो. तो जे सत्य बोलतो ते त्यांना पचवू शकत नाही.
भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव का आणला? असा सवाल करत विरोधकांवरच निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, राहुल गांधींनी दाखवलेली माहिती चुकीची आहे. ओम बिर्ला यांना अनेकदा घेरण्याचा प्रयत्न केला गेला. भाजप विरोधी पक्षात असताना कधीही लोकसभा अध्यक्षांना घेरलं नाही. आम्ही वॉक आऊट केलं पण कधीही अध्यक्षांवर कागद फेकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहितात कधीही तडजोड करत नाहीत. विरोधी पक्षनेते हे खूप जबाबदारीचे पद आहे.