गुजरातमध्ये २५०० कोटींच्या सायबर गुन्ह्याचा भंडाफोड

0

बँक अधिकाऱ्यांसह तब्बल २० जणांना अटक

राजकोट : गुजरातच्या राजकोट येथे तब्बल २५०० कोटी रुपयांच्या सायबर फसवणुकीचा मोठा घोटाळा उघडकीस आलाय. या प्रकरणात खासगी बँकांतील काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत २० जणांना अटक केली आहे. राजकोट ग्रामीणचे पोलिस अधीक्षक विजय गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाधाधरी येथील यस बँकेचे पर्सनल मॅनेजर मौलिक कामाणी, जामनगर येथील ॲक्सिस बँकेचे व्यवस्थापक कल्पेश डांगरिया आणि एचडीएफसी बँकेचे पर्सनल बँकर अनुराग बाल्धा यांना कथित सहभागाच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. मौलिक कामाणी याच्यावर आधी अटक करण्यात आलेल्या आरोपींना संशयास्पद खाती उघडण्यासाठी आणि ती व्यवस्थापित करण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. विविध कागदपत्रांचा वापर करून ही खाती सक्रिय ठेवण्यात आली, ज्यामुळे मोठ्या व्यवहारांवर बँकेकडून येणारे अलर्ट टाळले जात होते.

कल्पेश डांगरिया याने बनावट ओळखपत्रांच्या आधारे खाती उघडण्यास मदत केली, तर अनुराग बाल्धा याने पडताळणी आणि प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण करून नवीन खाती सुरू केली. या तिघांनी खात्यांमधून रोख रक्कम काढण्यातही मदत केली, जी नंतर हवाला मार्गाने पुढे पाठवली जात होती. या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून, याआधी अटक केलेले इतर आरोपी सध्या तुरुंगात आहेत. आतापर्यंत पोलिसांनी या रॅकेटशी संबंधित ८५ बँक खात्यांची ओळख पटवली आहे आणि सायबर क्राइम पोर्टलवर ५३५ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech