क्रिकेटच्या इतिहासात जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे तसाच विधानसभेत वहिनींनी केलेला विक्रम चंद्र – सुर्य – तारे असेपर्यंत राहणार”…….!

0

सुनील तटकरेंनी केला बारामतीकरांना मानाचा मुजरा…..

(अनंत नलावडे)

मुंबई :  संपूर्ण भारतात विधानसभेचा आतापर्यंतचा विक्रम मोडत बारामतीकरांनी स्वर्गीय नेते… महाराष्ट्राचे विकासपुरुष अजितदादांना जी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित केली त्याबद्दल तमाम बारामतीकरांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी सोमवारी संध्याकाळी पक्ष कार्यालयात खास पत्रकार परिषद घेऊन मानाचा मुजरा केला.

या निवडणूकीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना तटकरे म्हणाले की,वहिनींनी रेकॉर्डब्रेक म्हणजे २ लाख १८ हजार मताधिक्याने विजय मिळवला.सरासरी ९८ टक्के झालेल्या मतदानामध्ये हे मतदान बारामतीकरांनी वहिनींच्या पाठीशी उभे करत दादांनी आजवर जी काही बारामतीची सेवा केली त्याची योग्य पध्दतीने अंत:करणापासून भावना व्यक्त केली असे सांगतानाच दादांनाही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना वहिनींचेही तटकरे यांनी खास अभिनंदन केले.आजवर क्रिकेटच्या इतिहासात जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम आहे तसाच विधानसभेत वहिनींनी केलेला विक्रम चंद्र – सुर्य – तारे असेपर्यंत राहणार आहे असेही तटकरे यावेळी ठासून सांगितले.

अकरा वेळा अर्थसंकल्प आणि सहा वेळा उपमुख्यमंत्री असा दादांच्या नावाने विक्रम आहेच शिवाय वहिनी पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात झालीच आहे. आजचं मतदान एका वेगळ्या भावनेकडे घेऊन जाणारे असल्याचे सांगत तटकरे म्हणाले,आज राहुरीची पोटनिवडणूकही देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारवर राज्यातील जनतेने दृढ विश्वास व्यक्त केला आहे.त्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानतानाच जसे बारामतीकरांनी प्रेम व्यक्त केले तसेच खासदार पार्थ पवार, जय पवार आणि बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असंख्य पदाधिकाऱ्यांनी मतदारांपर्यंत पोचण्याचे जे अचूक नियोजन केले त्याबद्दल तटकरे यांनी अभिनंदन केले.

प. बंगाल च्या भाजपच्या अभूतपूर्व विजयाबद्दल विचारले असता तटकरे म्हणाले की,देशाला जगाच्या पाठीवर उत्तम पध्दतीने अधिक विकसित राष्ट्र करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे कणखर गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पश्चिम बंगाल मध्ये १५ वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडानंतर परिवर्तन झाले ते अभूतपूर्व अशा पध्दतीचे आहे अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली.

अमित शहा हे पश्चिम बंगालमध्ये गेले वर्षभर जी रणनीती करत होते त्यांचे हे यश असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा संबंध देशव्यापी प्रभावित होत आहे हे आज आपल्याला पश्चिम बंगाल व पदुचेरी, आसाम यामध्ये मिळालेल्या यशातून दिसत आहे असेही तटकरे यांनी स्पष्ट केले.

तामिळनाडूमध्ये जे सत्तांतर झाले आणि सत्तांतर होत असताना भाजपचा मित्र पक्ष असलेल्या एडीएमकेने सुध्दा दुसर्‍या क्रमांकाच्या मिळवलेल्या जागा हे सुद्धा यश अण्णा द्रमुक पक्षाचे जसे आहे तसेच त्या राज्यात अमित शहा यांनी रणनीती आखली होती.जयललिता यांच्या दु:खद निधनानंतर पक्ष विघटीत झाला.पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आल्यासारखे तामिळनाडूमध्ये झाले होते.अशावेळी भाजपचा मित्रपक्ष म्हणून, एनडीएचा मित्रपक्ष म्हणून नेत्रदीपक यश मिळवले आहे तो अमित शहा यांच्या रणनीतीचा भाग आहे असेही तटकरे यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech