अमेरिकेच्या दबावानंतरही भारताची रशियन तेल आयात विक्रमी पातळीवर

0

नवी दिल्ली : अमेरिकेकडून रशियन तेल खरेदीवर कठोर भूमिका घेतली जात असताना आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यांनंतरही भारताने जून महिन्यात रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीत विक्रमी पातळी कायम ठेवली आहे. इतकेच नव्हे, तर संयुक्त अरब अमिराती (यूएई) कडूनही तेल खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे.

विश्लेषकांच्या मते, होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली होण्यापूर्वी आणि आखाती देशांकडून कच्च्या तेलाचा पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यापूर्वी भारतीय रिफायनरी कंपन्यांनी पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी आयात वाढवली आहे. समुद्री आणि वस्तूविषयक माहिती देणाऱ्या ‘केप्लर’ या संस्थेच्या आकडेवारीनुसार, १९ जूनपर्यंत भारताने रशियाकडून सरासरी २६.६ लाख बॅरल प्रतिदिन (बीपीडी) कच्च्या तेलाची आयात केली असून, मे महिन्यात हा आकडा १९.१ लाख बीपीडी होता. त्यामुळे रशिया हा भारताचा सर्वात मोठा तेलपुरवठादार म्हणून कायम आहे.

जून महिन्यात यूएईकडून भारताने ६.३६ लाख बीपीडी कच्च्या तेलाची आयात केली, जी मे महिन्यातील विक्रमी ६.४४ लाख बीपीडीच्या जवळपास आहे. तर, २.०९ लाख बीपीडी पुरवठ्यासह व्हेनेझुएला हा भारताचा चौथा सर्वात मोठा कच्चे तेल पुरवठादार म्हणून उदयास आला आहे. सौदी अरेबियाकडून ३.८४ लाख बॅरल प्रतिदिन इतकी आयात झाली.

याउलट, अमेरिकेकडून होणारी तेल आयात घटून केवळ ९१ हजार बीपीडीवर आली आहे. मे महिन्यात हा आकडा २.५२ लाख बीपीडी होता. भारताच्या खरेदी धोरणामध्ये विविधीकरणाची रणनीती स्पष्टपणे दिसून येत आहे. रशियाकडून सवलतीच्या दरात मिळणारे कच्चे तेल अद्याप आकर्षक ठरत असून, होर्मुझ सामुद्रधुनीतील अनिश्चिततेच्या काळात यूएईकडून वाढलेली खरेदी पुरवठा सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech