कांद्याला भाव न मिळाल्याने समृद्धी महामार्गावर आंदोलन; अंबादास दानवे ताब्यात

0

छत्रपती संभाजीनगर : अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गाजवळ ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत न्याय्य दराची मागणी केली. राज्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना बाजारात कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर चक्काजाम करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, समृद्धी महामार्ग हा महत्त्वाचा आणि वेगवान वाहतुकीचा मार्ग असल्याने पोलिस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव आंदोलनास परवानगी नाकारली होती. महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊ नये आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परवानगी नसतानाही आंदोलन सुरू ठेवल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करत अंबादास दानवे यांना ताब्यात घेतले. यानंतर आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेतकऱ्यांनी शासनाने तातडीने कांद्याला हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी केली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech