नवी दिल्ली : चीनच्या शान्शी प्रांतात झालेल्या भीषण कोळसा खाण दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या संवेदनांबद्दल चीनने भारताचे आभार मानले आहेत. या दुर्दैवी दुर्घटनेत किमान अनेक जणांचा मृत्यू झाला असून, दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. भारतातील चीनचे राजदूत झू फेइहोंग यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टला उत्तर देताना म्हटले की, या कठीण काळात भारताने व्यक्त केलेली सहानुभूती आणि पाठिंबा अत्यंत मोलाचा आहे.
चिनी राजदूत झू फेइहोंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवेदना संदेशाबद्दल त्यांचे आभार मानताना एक्सवर लिहिले की, “शान्शी प्रांतातील खाण दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या संवेदनांबद्दल आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. या कठीण काळात भारतातील जनतेने दिलेली सहानुभूती आणि साथ आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या संवेदना मृतांच्या कुटुंबीयांसोबत तसेच बेपत्ता व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहेत. बचाव आणि मदतकार्यांसाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.”
याआधी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग यांना या दुर्घटनेबद्दल शोकसंदेश पाठवला होता. पंतप्रधान मोदी यांनी एक्सवर लिहिले होते की, “चीनच्या शान्शी प्रांतातील खाण दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीमुळे मला अत्यंत दुःख झाले आहे.” “भारताच्या जनतेतर्फे राष्ट्राध्यक्ष शी चिनफिंग आणि चीनच्या जनतेप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ईश्वर मृतांच्या कुटुंबियांना या दुःखद प्रसंगी धैर्य देवो. तसेच बेपत्ता असलेल्या सर्व व्यक्ती सुरक्षितपणे बाहेर येवोत, अशी मी प्रार्थना करतो.”
चिनी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा वायू स्फोट शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी ७:२९ वाजता किनयुआन काउंटीतील लिउशेनयू कोळसा खाणीत झाला. शनिवारी अधिकाऱ्यांनी या दुर्घटनेत अनेक जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली, तर दोन जण अजूनही बेपत्ता एके ््ललं असल्याचे सांगितले.या दुर्घटनेत जखमी झालेल्या एकूण १२८ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
दुर्घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाणीत दीर्घकाळापासून विषारी आणि घातक वायूंचे प्रमाण सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त होते, त्यामुळे पुन्हा दुर्घटना होण्याचा धोका वाढला होता. तसेच खाण चालवणाऱ्या कंपनीकडून कायद्यांचे गंभीर उल्लंघन झाल्याचेही समोर आले आहे. सरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, किनयुआन प्रशासनाची जबाबदारी सांभाळणाऱ्या चांगझी शहराचे महापौर चेन शियांगयांग यांनी सांगितले की, कंपनीतील जबाबदार अधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच व्यापक सुरक्षा तपासणी पूर्ण होईपर्यंत कंपनीच्या सर्व कोळसा खाणींमधील उत्पादन पूर्णपणे बंद करण्यात आले आहे.