सोलापूर : मराठा समाजाला न्याय देण्याबाबत महायुती सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच सकारात्मक राहिली आहे. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व शंकांचे निरसन करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला जाईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोलापूर जिल्हा शिवसेना कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती पूर्ण ताकदीने उतरणार असून, सर्व १७ जागांवर विजय मिळवू, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मित्रपक्षांना सोबत घेऊन काम करण्याची गरज अधोरेखित केली. मित्रपक्षाला डावलल्यास कार्यकर्त्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते, असे सांगत स्थानिक स्तरावर पालकमंत्र्यांनी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सविस्तर भाष्य टाळत, पुढील १५ ते २० दिवसांत आचारसंहिता संपल्यानंतर सोलापूर एमआयडीसीचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, असे आश्वासन उद्योगमंत्र्यांनी दिले. महायुतीमध्ये शिवसेनेने आपल्या विद्यमान जागा कायम ठेवण्याबरोबरच अतिरिक्त एक ते दोन जागांची मागणी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर असून, पुढील दोन दिवसांत जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला निश्चित होईल, अशी माहितीही सामंत यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेचे ११० स्थानिक सदस्य असल्याचे सांगत त्यांनी, “पालकमंत्री कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याने महायुतीतील सर्व नेते व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालले पाहिजे. समन्वयाने काम केल्यास निवडणूक सोपी होईल. मात्र, मित्रपक्षाला डावलून राजकारण केल्यास कार्यकर्त्यांमध्ये कटुता निर्माण होऊ शकते,” असे स्पष्ट केले. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांना सर्वांना सोबत घेण्याबाबत आपण विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.