मुंबई : देशात यंदाच्या मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याने सरासरी पर्जन्यमान कमी राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत विभागाने पावसाचा सुधारित अंदाज जाहीर करत यंदा देशात सुमारे ९० टक्के पाऊस पडेल, असे सांगितले. यापूर्वी एप्रिल महिन्यात संपूर्ण देशात सरासरीच्या ९२ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, आता त्यात सुधारणा करून पावसाचे प्रमाण आणखी घटण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थितीबाबत महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. त्यांच्या मते, यंदाच्या मान्सूनवर एल निनोचे सावट असून जून महिन्यात त्याचा परिणाम फारसा तीव्र जाणवणार नाही. मात्र जुलै आणि ऑगस्टमध्ये या घटनेचा प्रभाव सर्वसाधारण स्वरूपात दिसू शकतो, तर सप्टेंबर महिन्यात तो सर्वाधिक असेल. त्यामुळे मान्सूनच्या प्रवाहावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची कमतरता अधिक जाणवण्याची शक्यता आहे. चार महिन्यांच्या कालावधीत पर्जन्यमान कमी राहिले, तर त्याचे परिणाम शेती, पिण्याचे पाणी, ऊर्जा आणि आरोग्य या सर्वच क्षेत्रांवर उमटू शकतात. एवढेच नाही, तर पुढील वर्षभर त्याचे प्रतिकूल परिणाम जाणवण्याचीही शक्यता त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांनीही यंदाचा पावसाचा अंदाज चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या माहितीनुसार, सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता साठ टक्के इतकी आहे. हवामान विभागाच्या निकषांनुसार नव्वद टक्के पाऊस हेदेखील कमी मानले जाते. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांत पावसाचे प्रमाण सरासरीखाली राहण्याची दाट शक्यता आहे. जूनमध्ये एल निनोचा प्रभाव कमी असला, तरी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तो अधिक वाढत जाईल, असे प्रभुणे यांनी सांगितले. मान्सून केरळमध्ये दाखल झाल्यानंतर साधारण चाळीस ते पंचेचाळीस दिवसांत राजस्थानपर्यंत पोहोचतो. मात्र, उत्तरेकडे त्याची वाटचाल उशिरा झाली, तर काही भागांत उष्णतेच्या लाटा जाणवू शकतात, असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.