“क्वांटम सेफ्टी प्रॅक्टिस’’ने हॅकिंगला म्हणा कायमचा रामराम!

0

“हार्वेस्ट नाऊ, डिक्रिप्ट लेटर” मुळे एन्क्रिप्टेड माहिती भविष्यात क्वांटम संगणकांच्या मदतीने होऊ शकते उघड

 नागपूरच्या अभियंत्याने विकसित केलेले अभूतपूर्व स्वदेशी तंत्रज्ञान देणार उपाय 

नागपूर: आजच्या डिजिटल युगात एखादी माहिती एन्क्रिप्शनच्या माध्यमातून सुरक्षित ठेवली की ती कोणालाही वाचता येणार नाही, अशी सर्वसाधारण समजूत आहे. मात्र जगभरातील सायबर सुरक्षा तज्ज्ञ आता एका नव्या धोक्याबाबत इशारा देत आहेत. “हार्वेस्ट नाऊ, डिक्रिप्ट लेटर” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या धोक्यामुळे आज चोरीला गेलेली एन्क्रिप्टेड माहिती भविष्यात क्वांटम संगणकांच्या मदतीने उघड केली जाऊ शकते.

यू एलिमेंट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक चैतन्य घाटे यांच्या मते, सध्या वापरले जाणारे अनेक एन्क्रिप्शन तंत्रज्ञान भविष्यातील अत्याधुनिक क्वांटम संगणकांसमोर टिकू शकणार नाहीत. त्यामुळे सरकारी माहिती, आर्थिक व्यवहार, संरक्षण क्षेत्रातील डेटा आणि नागरिकांची वैयक्तिक माहिती यांचे संरक्षण करण्यासाठी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे.

महाराष्ट्राच्या दृष्टीने हा विषय अधिक महत्त्वाचा ठरतो. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असून येथे शेअर बाजार, बँका आणि वित्तीय संस्थांमधून दररोज मोठ्या प्रमाणात संवेदनशील डिजिटल व्यवहार होतात. याशिवाय आधार, यूपीआय, आरोग्य व्यवस्था, दूरसंचार आणि सरकारी यंत्रणांमधील मोठ्या प्रमाणातील माहितीचे संरक्षण भविष्यातील मोठे आव्हान ठरणार आहे.

पुणे हे संरक्षण, एरोस्पेस आणि संशोधन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र आहे. या क्षेत्रांमध्ये तयार होणारी माहिती अनेक दशकांपर्यंत सुरक्षित राहणे आवश्यक असते. त्यामुळे क्वांटम युगातील सुरक्षा उपाययोजनांची गरज अधिक तीव्रतेने जाणवत आहे.

याच पार्श्वभूमीवर पुण्यातील यू एलिमेंट टेक्नॉलॉजीज क्वांटम सुरक्षिततेच्या क्षेत्रात काम करत आहे. सायबर सुरक्षा, एंटरप्राइज इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्वांटम-सेफ तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणारी ही कंपनी संस्थांना भविष्यातील धोक्यांसाठी तयार करण्याचा प्रयत्न करत आहे.

कंपनीने विकसित केलेल्या “क्वांटम सेफ्टी प्रॅक्टिस” अंतर्गत पोस्ट-क्वांटम क्रिप्टोग्राफी, क्वांटम की डिस्ट्रिब्युशन आणि भविष्यातील क्वांटम हल्ल्यांना तोंड देऊ शकतील अशा सुरक्षा संरचना विकसित करण्याचे काम सुरू आहे. चैतन्य घाटे सांगतात की, क्वांटम सुरक्षितता हा केवळ तंत्रज्ञानाचा विषय नसून राष्ट्रीय सुरक्षेशी आणि आर्थिक स्थैर्याशी संबंधित मुद्दा बनत आहे.

क्वांटम संगणक उपलब्ध झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्था बदलणे एका दिवसात शक्य होणार नाही. अनेक संस्थांना त्यांच्या नेटवर्कमध्ये नेमक्या कोणत्या ठिकाणी जुनी आणि असुरक्षित एन्क्रिप्शन प्रणाली वापरली जाते, याचीही पूर्ण माहिती नसते. त्यामुळे संभाव्य जोखमींचे मूल्यांकन, संक्रमण आराखडा तयार करणे आणि नवीन सुरक्षा उपाय लागू करणे ही प्रक्रिया आतापासूनच सुरू करावी लागणार आहे.

भारत सरकारच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनच्या उद्दिष्टांना पूरक ठरेल अशा पद्धतीने यू एलिमेंट टेक्नॉलॉजीज स्वदेशी तंत्रज्ञान विकासावर भर देत आहे. ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांशी सुसंगत अशी उपाययोजना विकसित करून देशातील महत्त्वाच्या संस्था आणि उद्योगांना भविष्यातील सायबर धोक्यांपासून सुरक्षित करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.

क्वांटम युग पूर्णपणे आलेले नसले तरी त्याची चाहूल स्पष्टपणे लागली आहे. त्यामुळे भविष्यातील अदृश्य सायबर धोक्यांना सामोरे जाण्यासाठी आजपासूनच तयारी करणे ही काळाची गरज बनली आहे. या दिशेने महाराष्ट्रातील स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान कंपन्या पुढाकार घेत असल्याचे यू एलिमेंट टेक्नॉलॉजीजच्या कामातून दिसून येत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech