नवी दिल्ली | प्रतिनिधी
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (युएनएससी) भारताविरुद्ध कट रचणाऱ्या पाकिस्तान आणि चीनला अमेरिकेने मोठा धक्का दिला आहे. अल-कायदा आणि इसिसशी संबंधित दहशतवाद्यांवर जागतिक बंदी घालणाऱ्या ‘यूएन १२६७’ प्रतिबंधात्मक यादीत ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ (बीएलए) आणि ‘मजीद ब्रिगेड’ या संघटनांचा समावेश करण्याचा पाकिस्तान आणि चीनचा संयुक्त प्रस्ताव अमेरिकेने अधिकृतपणे फेटाळून लावला आहे. या संघटनांचा अल-कायदा किंवा इसिसशी कोणताही थेट संबंध असल्याचा ठोस पुरावा नसल्याचे स्पष्ट करत अमेरिकेने या प्रस्तावाला रोखले. भारताने राजनैतिक पातळीवर केलेल्या भक्कम प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. फ्रान्स आणि ब्रिटननेही अमेरिकेच्या या भूमिकेला उघड पाठिंबा दिल्याने आंतरराष्ट्रीय मंचावर हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जात आहे.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर हे बीएलए आणि मजीद ब्रिगेड या बलुच संघटनांना ‘यूएन’ स्तरावर दहशतवादी ठरवून त्यांच्या कारवायांचे खापर भारतावर फोडण्याचा आणि भारताला ‘दहशतवादाचा समर्थक’ म्हणून बदनाम करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. मात्र, अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या या निर्णायक भूमिकेमुळे पाकिस्तानचा हा अजेंडा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ‘दहशतवादाच्या मुद्द्यावर आम्ही भारताच्या भूमिकेशी सहमत आहोत आणि चीनच्या दबावाखाली येणार नाही,’ असा स्पष्ट संदेश अमेरिकेने यातून दिला आहे. जागतिक महासत्तांनी भारताच्या पारदर्शक भूमिकेला दिलेली साथ ही पाकिस्तानच्या खोट्या प्रोपगंडाला सणसणीत चपराक असून, या निर्णयामुळे एकाकी पडलेला पाकिस्तान आता या संघटनांवर बंदी आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या इतर पर्यायांचा शोध घेण्यास भाग पडला आहे.