परभणी : परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील यशवाडी येथील हनुमान मंदिरात शनिवारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत ५ भाविकांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातातील मृतांमध्ये संतोष गडदे (पांगरा), आकाश सुरदोसे (गंगाखेड रोड, परभणी), नुमेश अग्रवाल (जिंतूर), सुरज कोपरटकर (इटाळी) आणि श्रीकृष्ण बलभीम गवारे (चिंचवडगाव, वडवणी) यांचा समावेश आहे.
जखमींमध्ये अनिकेत संतोष गडदे, हनुमंत लिपने, प्रवीण प्रकाश राजबिदे, नारायण दौलत खरात, दादाराव नागोजी भंगे, रामकृष्ण बदादे, परमेश्वर कुंडलिक राऊत, नागेश विठ्ठल इक्कर, केशव गिरी, प्रवीण रघुनाथ हाळगे, ओमकार मारोती कोपरेतकर, सौरभ गजानन कोठलकर, ऋषिकेश कोपरेतकर, रामा घुगे, रामेश्वर बोंडे आणि धनंजय बोचरे यांचा समावेश आहे. त्यांच्यावर परभणी येथील आर. पी. रुग्णालय आणि शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, शिवसेना नेते सईद खान, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर तसेच जिल्हाधिकारी संजय चव्हाण यांनी पाहणी करून बचावकार्याचा आढावा घेतला.
दरम्यान, पालकमंत्री मेघना बोर्डीकर आणि खासदार संजय जाधव यांनी प्रशासनाला तातडीने मदत व बचावकार्य राबविण्याच्या सूचना दिल्या. या घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली असून जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत घटनेबद्दल शोक आणि मृतकांच्या कुटुंबियासाठी सहवेदना व्यक्त केली आहे. तसेच राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.