मुंबई : निवडणुकीचा खेळ कसा खेळला जातोय, किती चालाखीने खेळला जातोय याची कल्पना आपल्याला नसेल तर निवडणुका लढवण्याला काहीही अर्थ नाही. मी २०१९ला सांगत होतो निवडणुकांवर बहिष्कार टाकायला हवा, ज्या प्रकारचं राजकारण, ज्या प्रकारच्या निवडणुका सध्या सुरू आहेत हे पाहता हाताला काही लागणार नाही आणि लागलं तरी हे आमदार, खासदार पळवून नेतील. आपल्याकडे खासदार फोडणं सुरू आहे, सत्तेसाठी राजकारण सुरू आहे. मला वाटतं या सगळ्या गोष्टींकडे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा जनतेनं लक्षं ठेवलं पाहिजे. एक जुनं वाक्य आहे “स्वाभिमान मेला की उरतात फक्त जिवंत प्रेतं.”, असे उपरोधिक मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले. ते आज (२० जून) मुंबईतील वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात, मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे जिल्हा आणि महापालिका क्षेत्रांतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
ठाकरे पुढे म्हणाले की, या आमदार, खासदार पळवापळवीमध्ये आपण आपल्या मुलभूत गोष्टी विसरून जातोय. महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा इतिहास, देशाची परंपरा आपण विसरत चाललोय. कोण सत्तेवर आहे याने मला फरक पडत नाही. सत्तेवर बसून तुम्ही काय करताय याने मला फरक पडतो. सत्तेवर बसून चुकीचे पायंडे पाडले जातायेत याचं कोणाला भान उरलेलं नाही. आपलं आंदोलन घरापर्यंत पोहोचतं पण घर मतपेटीपर्यंत पोहोचत नाही याला काय म्हणायचं? आपल्या आजूबाजूला काहीतरी षडयंत्र रचलं जातंय याची आपल्याला कल्पना आहे का?
आम्ही हातात बांगड्या नाहीत भरल्या असं म्हणणाऱ्याने मराठी माणसाचं मनगट पाहिलंय का कधी? आम्हाला वाद नको आहेत पण वाद उकरून काढणार असाल तर आम्ही रस्त्यावर उभे राहू. महाराजांच्या जिरेटोपावर जैनांचा झेंडा, हे इथपर्यंत गेलं? या गोष्टी जाणूनबुजून सुरू आहेत का? निवडणूक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करून तुम्हाला आंदोलनामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी हे सुरू आहे का याकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही धर्माचं काम करत आहात, ते करत राहा. उगाच नको ते उद्योग कशाला करता? मध्यंतरी कबुतरांचा विषय आला, आता पांढरी पट्टी, हे सगळं राजकारण्यांच्या नादी लागून करतायेत.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार देशात सर्वात जास्त २२,१७४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. आज शेतकरी आत्महत्या करतायेत, नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थी आत्महत्या करतायेत. राज्यात लहान मुलं, मुली पळवण्याचे प्रकार घडतायेत. एवढं सगळं सुरू असताना आपल्याकडे खासदार, आमदार, नगरसेवक फोडण्याचं काम सुरू आहे.
केंद्राच्या रिपोर्टनुसार MSEDCL ला पॉवर डिस्ट्रिब्युशनमध्ये १०० पैकी दीड गुण मिळालेत. MSEDCL चा आता IPO येत आहे अशावेळी दीड टक्का मिळालेल्या कंपनीत गुंतवणूक करायला कोण येणार? कंपनी अदानीच्या हातात देऊन महाराष्ट्राचा वीज पुरवठा ताब्यात घेण्याचं हे कारस्थान आहे.
मतदारयादी पुनर्निरिक्षण (SIR) या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका, आपलं मतदार याद्यांकडे लक्ष नसल्याने काय गोष्टी घडू शकतात हे आपण पाहिलं. लवकरच जनगणना सुरू होत आहे. माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, डोळ्यात तेल घालून या जनगणनेवर लक्ष ठेवा. काही ठिकाणी, घर गणनेच्या वेळेस भाजपचे लोकं तिकडे हजर असतात. ते अंदाज घेत आहेत की या घरात आपले मतदार आहेत का नाही? जर त्यांना वाटलं, नाही तर त्यांची नावं काढून टाकण्याच्या हालचाली सुरु होतात. तुम्ही आंदोलनं करता, ती लोकांना आवडतात, लोकांपर्यंत पोहचतात पण त्यांची मतं आपल्यापर्यंत का पोहचत नाहीत याचा विचार करा. ३ वर्षांनंतर निवडणुका आहेत म्हणून गाफील राहू नका, असे आवाहन ठाकरे यांनी केले.