सामर्थ्यशाली भारताची आत्मविश्वासाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल – पीयूष गोयल

0

मुंबई : भारतीयांचे सामर्थ्य, समृद्धी, स्वाभिमान आणि आत्मविश्वास वाढवत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारा वर्षांच्या कार्यकाळात भारत आत्मनिर्भर होण्यासाठी प्रेरित केले. १४० कोटी जनतेने घेतलेला विकसित भारत २०४७ चा दृढसंकल्प हा आमचा मूलमंत्र आणि ध्येय आहे. जनतेच्या विश्वासासोबत देशाचा विकास, वारसा आणि जनकल्याणाचे काम पुढे जाईल, अशा शब्दात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी मोदी सरकारच्या बारा वर्षांच्या कार्यकाळाचा विस्तृत आढावा घेतला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रदेश सह माध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान, प्रदेश प्रवक्ते पंकज मोदी यावेळी उपस्थित होते.

गोयल म्हणाले की, वास्तविक गेल्या बारा वर्षांच्या कालावधीत कोविड महामारी, युक्रेन युद्ध अशा अनेक आंतरराष्ट्रीय समस्या उद्भवल्या. मात्र नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक संकटाला संधीत बदलण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात झालेले ९ मुक्त व्यापार करार ३८ विकसित देशांची बाजारपेठ भारतातील उद्योजक, शेतकरी, मच्छीमार, महिला उद्योजिकांना खुली करत त्यांना नव्या संधी, रोजगार आणि व्यापार उपलब्ध करून देत भारताला वेगाने पुढे नेण्याचे काम करत आहे. मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याचे काम केल्याचे  गोयल यांनी विषद केले.

केवळ भारताचेच नव्हे तर विश्वाचे लोकप्रिय नेते म्हणून जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ओळखू लागले आहे, त्यांची कामगिरी पाहून ३३ देशांनी आपल्या सर्वोच्च सन्मानाने त्यांना गौरवले आहे. यात विकसित देशांसोबतच असे अनेक देश आहेत जे भारताच्या फारसे जवळ नाहीत आणि त्यांच्यासोबत जुने नाते नाही. मोदींची लोकप्रियता सदैव वाढत आहे. अलीकडेच फ्रान्सच्या दौऱ्याहून परतलेल्या पंतप्रधानांनी अनेक देशांच्या नेत्यांशी केलेली द्विपक्षीय चर्चा, युके आणि भारतामध्ये झालेला मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू करण्याचा निर्णय याचे सकारात्मक परिणाम लवकरच पहायाला मिळतील, असे गोयल यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही भेदभावाशिवाय समाजातील अखेरच्या व्यक्तीपर्यंत सरकारी योजना पोहोचाव्यात आणि त्याचा त्यांना लाभ मिळावा, याकडे मोदी सरकारचा कटाक्ष राहिला आहे. तंत्रज्ञाची मदत घेत प्रामाणिक सरकारची प्रतिमा हे जगासमोरचे उदाहरण आहे. जन धन योजनेअंतर्गत ५५ कोटींहून अधिक बँक खाती उघडली, ज्यापैकी ३२ कोटींहून अधिक महिला आहेत. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळापासून ८१ कोटींहून अधिक नागरिकांना मोफत रेशन पुरवण्यात आले आहे. गरिबांना वैद्यकीय खर्चापासून वाचवण्यासाठी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ६० कोटींहून अधिक आरोग्यकार्ड जारी करण्यात आले आहेत, ज्यामुळे मोफत उपचारांची हमी मिळते. याशिवाय, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेने ५८ कोटींहून अधिक लोकांना भक्कम सुरक्षाकवच प्रदान केल्याची माहिती गोयल यांनी दिली.

गरिबांचे जीवन सुकर करण्यासाठी, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ४ कोटींहून अधिक कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून ११ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन देऊन त्यांना धुरापासून मुक्त करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनने १२ कोटींहून अधिक शौचालये बांधून देशात स्वच्छतेच्या क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणली आहे. सरकारच्या प्रबळ इच्छाशक्तीमुळे देश आज नक्षलवादापासून मुक्त झाला आहे. त्यातील तरुणांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले जात असल्याचे सांगत गोयल यांनी मोदी सरकारच्या अनेक योजनांचा तपशील मांडला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech