वनमंत्री गणेश नाईक यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा……!
भाजप आ. प्रमोद जठारांच्या मागणीने विधानपरिषदेत रंगली जोरदार चर्चा
(अनंत नलावडे)
मुंबई : महायुती सरकारने कोकणासाठी आणखी एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे संकेत दिले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात गुजरातच्या बहुचर्चित ‘वनतारा’ प्रकल्पाच्या धर्तीवर भव्य राष्ट्रीय उद्यान उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्याला कारण आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीचे भाजप आमदार प्रमोद जठार यांनी बुधवारी विधानपरिषदेत ही मागणी जोरदारपणे मांडल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत अधिकाऱ्यांना पाहणीचे आदेश देण्याची घोषणा केली. विशेष म्हणजे या प्रस्तावित उद्यानाला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यासही सरकार अनुकूल असल्याचे स्पष्ट संकेत सभागृहात देण्यात आले.
यामुळे आगामी काळात कोकणातील पर्यटन, वन्यजीव संवर्धन आणि रोजगारनिर्मिती यांना चालना देणारा हा प्रकल्प महायुती सरकारचा आणखी एक महत्त्वाचा राजकीय आणि विकासात्मक ‘मास्टरस्ट्रोक’ ठरू शकतो, अशी चर्चा मंत्रालयीन वर्तुळात सुरू झाली आहे.
“मुंबईतच राष्ट्रीय उद्यान का….?कोकणालाही हक्क आहे”…….
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या नामकरणाच्या चर्चेदरम्यान आमदार प्रमोद जठार यांनी थेट सरकारचे लक्ष सिंधुदुर्गकडे वेधले.महाराष्ट्रात राष्ट्रीय उद्यान केवळ मुंबईपुरते मर्यादित राहू नये, असा मुद्दा मांडत त्यांनी तिलारी खोऱ्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यातही “तिलारी” हे केवळ जंगल नाही तर संपूर्ण देशातील दुर्मिळ जैवविविधतेचा खजिना आहे. गुगलला किंवा चॅट जीपीटीला विचारले तरी ‘ॲमेझॉन ऑफ इंडिया’ म्हणून तिलारीचे नाव पुढे येते. हजारो एकर जंगल, व्याघ्र संवर्धन क्षेत्र, दुर्मिळ वन्यजीव, स्थलांतरित हत्ती आणि पर्यटनासाठी अनुकूल भौगोलिक स्थिती यामुळे हे क्षेत्र राष्ट्रीय उद्यानासाठी सर्वार्थाने पात्र आहे,” असेही जठार यांनी या संदर्भात उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना सांगितले.
गुजरातमधील कोरड्या प्रदेशात हजारो एकरांवर वनतारा प्रकल्प उभा राहू शकतो, तर हिरवाईने नटलेल्या दोडामार्गमध्ये त्याहून मोठा आणि जागतिक दर्जाचा प्रकल्प उभा राहू शकत नाही का, असा सवाल जठार यांनी उपस्थित केला. त्यातही “५० टक्के क्षेत्रात वन्यजीव पुनर्वसन आणि ५० टक्के क्षेत्रात सफारी विकसित केली तर महाराष्ट्राला जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र मिळेल. गोव्यातील मोपा विमानतळामुळे या भागात पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राष्ट्रीय उद्यानामुळे हजारो रोजगार निर्माण होतील आणि कोकणच्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
वनमंत्री गणेश नाईक यांचे सभागृहात मोठे आश्वासन……
आमदार प्रमोद जठार यांच्या मागणीवर उत्तर देताना वनमंत्री गणेश नाईक यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत सरकारचा स्पष्ट कल सभागृहात मांडला.नाईक म्हणाले,
“जठार साहेबांनी मांडलेला विषय अत्यंत महत्त्वाचा आणि अभ्यास करण्यासारखा आहे. तिलारी खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील आणि समृद्ध क्षेत्र आहे.त्यांनी सुचविलेल्या क्षेत्राची ड्रोन फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि सर्व आवश्यक माहिती वनविभागाकडे तात्काळ पाठवावी.आमचे विभागीय वन अधिकारी त्वरित संबंधित लोकप्रतिनिधींशी संपर्क साधतील. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करेल.”यापुढे बोलताना त्यांनी सरकारच्या भूमिकेचे संकेत देत म्हटले,
“जर सर्व तांत्रिक बाबी अनुकूल आढळल्या आणि वन्यजीव संवर्धनाच्या निकषांमध्ये हे क्षेत्र बसत असेल, तर या प्रस्तावावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल. कोकणातील वनसंपदा आणि पर्यटन विकास यांचा समतोल राखत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय उद्यान विकसित करण्याबाबत आम्ही गांभीर्याने विचार करू,”अशी ग्वाहीही वनमंत्री नाईक यांनी दिली.
सभागृहात सर्वाधिक लक्ष वेधून घेणारी घोषणा करताना नाईक म्हणाले,
“दिवंगत पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने या उद्यानाची ओळख निर्माण करण्याची मागणीही सरकार सकारात्मकपणे विचारात घेईल.जागा निश्चित झाल्यानंतर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यास आम्ही तयार आहोत.”
महायुतीचा कोकणासाठी नवा ‘व्हिजन प्लॅन’……?
सिंधुदुर्ग, दोडामार्ग आणि तिलारी खोऱ्याचा विकास हा गेल्या काही वर्षांपासून महायुतीच्या अजेंड्यावर राहिला आहे. कारण मोपा विमानतळ, किनारी पर्यटन, महामार्ग प्रकल्प आणि आता प्रस्तावित राष्ट्रीय उद्यानामुळे कोकणाला स्वतंत्र पर्यटन पट्टा म्हणून विकसित करण्याची रणनीती सरकार राबवत असल्याचे चित्र आहे.परंतु
राजकीय जाणकारांच्या मते, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने राष्ट्रीय उद्यान उभारण्याचा प्रस्ताव हा केवळ पर्यावरणीय निर्णय नसून कोकणातील विकास, पर्यटन आणि भाजपच्या वैचारिक वारशाला जोडणारा मोठा राजकीय संदेशही ठरू शकतो.