नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या विनंतीवरून सर्वोच्च न्यायालयाने कोळसा घोटाळा प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या विशेष न्यायाधीश सुनैना शर्मा आणि न्या. धीरज मोर यांना त्यांच्या पदावरून हटवण्यास मंजुरी दिली आहे. दोन्ही न्यायाधीशांना इतर जबाबदाऱ्या सोपवण्यासाठी त्यांची बदली करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टातील सरन्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. जॉयमाला बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.
दिल्ली उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल यांनी सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवून दोन्ही न्यायिक अधिकाऱ्यांना उत्कृष्ट गुणवत्तेचे अधिकारी असल्याचे नमूद केले होते. त्यांच्या सेवांचा इतर ठिकाणी उपयोग करून घेण्याची इच्छा असल्याचेही पत्रात सांगण्यात आले होते. न्या. सुनैना शर्मा यांनी याच वर्षी जानेवारीमध्ये कोळसा घोटाळा प्रकरणांसाठी विशेष न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला होता. त्यापूर्वी या विशेष न्यायालयाचे अध्यक्षपद सुमारे साडेचार वर्षे न्या. संजय बंसल यांनी सांभाळले होते. दुसरीकडे न्या. धीरज मोर यांची एप्रिल २०२५ मध्ये विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. शर्मा यांना पदभार स्वीकारून अवघे ६ महिने झाले होते, तर मोर यांनी एक वर्षाहून थोडा अधिक कालावधी पूर्ण केला होता.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयाच्या विनंतीला मंजुरी देताना दोन्ही न्यायाधीशांच्या जागी नवीन नियुक्त्यांनाही मान्यता दिली आहे. न्या. वीरेंद्र कुमार खर्ता हे सुनैना शर्मा यांची जागा घेणार असून, यापूर्वी ते साकेत येथील एनडीपीएस न्यायालयात विशेष न्यायाधीश होते. तर न्या. अजय गर्ग हे धीरज मोर यांच्या जागी नियुक्त झाले असून, ते यापूर्वी तीस हजारी येथील फास्ट-ट्रॅक न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी या बदल्यांसंदर्भातील आदेश जारी केले. मात्र, विशेष बाब म्हणजे न्या. सुनैना शर्मा आणि न्या. धीरज मोर यांना सध्या कोणतीही नवीन न्यायालयीन पोस्टिंग देण्यात आलेली नाही. अधिसूचनेनुसार, दोघांनाही प्रधान जिल्हा व सीबीआय सत्र न्यायाधीशांच्या कार्यालयाशी संलग्न करण्यात आले आहे.