सचिन अहिरांच्या उमेदवारीने ठाकरे गटात खळबळ
(अनंत नलावडे)
मुंबई : येत्या १ जुलै रोजी होणार विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीने महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक नवे वळण दिले आहे. शिवसेना (शिंदे)कडून सचिन अहिर यांनी मंगळवारी विधानभवनात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.एकेकाळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सक्रिय असलेले अहिर आता शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या भूमिकेत मैदानात उतरल्याने या निवडणुकीला केवळ घटनात्मक पदाची निवडणूक न राहता प्रतिष्ठेच्या राजकीय लढतीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
महायुतीने उपसभापतीपद कायम राखण्यासाठी टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा राजकीय समीकरणांवर आपली पकड दाखवल्याची चर्चा सुरू आहे.विधान परिषदेतील संख्याबळ आणि बदललेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता या उमेदवारीकडे सत्ताधारी गोटाच्या आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणूनही पाहिले जात आहे.
दुसरीकडे, या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतही राजकीय हालचालींना वेग आला आहे.विरोधकांकडून या उमेदवारीचा अर्थ ठाकरे गटासाठी राजकीय धक्का असा लावला जात असला, तरी संबंधित पक्षाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणे बाकी आहे. मात्र, उपसभापतीपदाच्या निवडणुकीने दोन्ही शिवसेनांमधील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आणल्याचेही स्पष्ट दिसत आहे.
आता सर्वांचे लक्ष १ जुलैच्या मतदानाकडे लागले आहे.उपसभापतीपदाचा निकाल हा केवळ एका पदाचा निर्णय ठरणार नसून, विधान परिषदेत महायुतीच्या राजकीय ताकदीची आणि विरोधकांच्या रणनीतीचीही कसोटी ठरणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना आणि नव्या समीकरणांना वेग येण्याची चिन्हे आहेत.
नुकत्याच संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामधून निवडून आलेल्या आमदारांच्या संख्याबळात विधानपरिषदेत एकट्या भाजप च्या आमदारांचे संख्याबळ लक्षणीय रित्या वाढून ते तब्बल ३५ झाले आहे.त्याखालोखाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ११ आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे ही निवडणूक फक्तं एक सोपासकर म्हणून पार पडणार असल्याचेही यानिमित्ताने मानले जाते.