मुंबई : राज्यात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यानंतर आता पावसाने वेग पकडण्यास सुरुवात केली आहे. जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यातील अनेक भागांत पावसाची जोरदार हजेरी लागली असून, पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. माहितीनुसार, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊल पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, मुंबईत पुढील ४ दिवस धुवांधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान हवामान विभागाने ३ आणि ४ जुलै रोजी कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, विदर्भ आणि मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. मुंबईत उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या काळात काही भागांत १०० मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात पुढील पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण रायगडमध्ये पुन्हा पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास भातलावणीच्या कामांना वेग येण्याची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्र किनारपट्टीलगत पूर्व-मध्य अरबी समुद्रावर चक्रीय स्थिती कायम असून, मध्य प्रदेशापासून सौराष्ट्र, उत्तर मराठवाडा मार्गे अरबी समुद्रापर्यंत द्रोणीय रेषा सक्रिय आहे. या प्रणालीमुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या २४ तासांत कोकणात म्हसळा येथे २४० मिमी, दापोली १९३ मिमी, मंडणगड १८० मिमी, खेड १७२ मिमी तर पनवेलमध्ये १२० मिमी पावसाची नोंद झाली. घाटमाथ्यावर लोणावळा येथे १६० मिमी, डुंगरवाडी १५८ मिमी आणि ताम्हिणीमध्ये १२५ मिमी पाऊस झाला. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक ठिकाणीही समाधानकारक पावसाची नोंद झाली आहे.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी ३ जुलैपासून ७ जुलैदरम्यान राज्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, जून महिन्यात राज्यात पावसाची मोठी तूट राहिली असून, विशेषतः विदर्भात जवळपास ५० टक्के कमी पाऊस झाला आहे. ही तूट लवकर भरून निघण्याची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.