खासदारांनंतर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उबाठाला जोरदार झटका
धनुष्यबाणावर परिषदेवर निवडून गेलेले अहिर शिवसेनेचेच आमदार
उपमुख्यमंत्री शिंदेंकडून आमदार अहिर यांच्या कामाचे कौतुक
आम्ही तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला आलोय
मुंबई : सहा खासदारांनंतर विधान परिषेदेतील आमदार सचिन अहिर यांना सोबत घेत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आठवडाभरात दुसऱ्यांदा उबाठाला जोरदार झटका दिला. आम्ही तुडवायला नाही तर शिवसेना वाढवायला आलोय, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक, आमदार डॉ. निलम गोऱ्हे, खासदार ओमराजे निंबाळकर तसेच नेते, उपनेत व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
विधान परिषद उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी आमदार अहिर यांनी मंगळवारी शिवसेनेकडून महायुतीचे उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आमदार सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावरच विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांना शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी मतदान केले. त्यामुळे सचिन अहिर हे शिवसेनेचेच आमदार आहेत. आठवडाभरापूर्वी खासदारांनी षटकार ठोकले आज आमदार अहिर यांनी षटकार ठोकला, असे ते म्हणाले. यापुढे चौकार, षटकार सुरुच राहतील आणि त्यांच्यातील एक एक विकेट पडेल, असे सूतोवाच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. जे काही निर्णय घेतो ते फुलप्रुफ (अचूक) घेतो, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार अहिर यांच्या राजकीय कारकिर्दीचे कौतुक केले. अहिर तीन वेळा विधान सभेचे आमदार होते, आता विधान परिषदेचे आमदार आहेत. ते सात विभागांचे राज्यमंत्री होते. गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर त्यांनी काम केले. मुंबईकरांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. कामगारांच्या अडचणी, कोळी बांधवांचे प्रश्न आणि शिवसैनिकांना न्याय देणारा तळागाळातला नेता शिवसेनेसोबत आला, त्याबद्दल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, विधानसभा आणि विधानपरिषदेत महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. बुधवारी अहिर यांची उपसभापतीपदी निवड होईल. ते मुंबईपुरता नाही तर महाराष्ट्रात उपसभापती म्हणून न्याय देण्याचे काम करतील. अहिर सोबत आल्याने शिवसेनेची मुंबई, पुणे तसेच त्यांनी केलेल्या कामांच्या विभागात ताकद वाढेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
आमचा अजेंडा खुर्ची नाही तर ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीत बसवले त्यांचे प्रश्न सोडवणं आणि त्यांना न्याय देणं आहे. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, लाडकी बहिण, युवा अशा प्रत्येकाच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम महायुती सरकारने केले, असे ते म्हणाले. लोकप्रतिनिधींना मतदार संघातील लोकांना न्याय द्यायचा आहे.आम्ही तोडकाम नाही तर जोडकाम करतो. काही लोक तुडवायला आले तर आम्ही शिवसेना वाढवायला आलोय. बाळासाहेबांचे आणि आनंद दिघेंचे विचार घेऊन पुढे चाललोय, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
दौरा करुन परतलेल्या शिव्या सेना प्रमुखांचे अहिर यांनी स्वागत केले
उबाठा गट सोडून शिवसेनेत प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदार संघांचा उबाठाने दौरा केला होता. हा दौरा आटोपून मुंबईत परतलेल्या शिव्या सेनेच्या प्रमुखांचे आमदार अहिर यांनी सोडचिठ्ठी देत स्वागत केले, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी लगावला. महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे, शिव्यांचे लाखोली वाहण्याची संस्कृती आपल्या राज्याची नाही. शिव्या देणाऱ्या लोकांना जनताच धडा शिकवेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट असे काहीजण करतात, अशी टीका त्यांनी केली.
देवेंद्रजींबाबत आता पुतनामावशीचे प्रेम उतू आलंय
देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना ५० फोन करुनही ज्या व्यक्तीने एकही फोन उचलला नाही. एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, अशा प्रकारची भाषा बोलले, देवेंद्रजींवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न केला, सागर बंगल्यावर पोलीस पाठवणाऱ्यांना आता देवेंद्रजींबाबत पुतना मावशीचे प्रेम आलंय, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. २०१९ मध्ये महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत आणि देवेंद्रजींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम त्यांनी केले. इतक्या जलदगतीने रंग बदलणारा सरडा पाहिला नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.