पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या मुसळधार पावसामुळे वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याच्या सूचना देण्यात आल्याने वारकरी मोठ्या संख्येने मार्केटयार्डात दाखल होत आहेत. यंदा वारकऱ्यांचा मुक्काम नेहमीच्या दोन दिवसांऐवजी तब्बल तीन दिवसांचा असणार असून, त्यांच्या स्वागतासाठी मार्केटयार्ड प्रशासन आणि व्यापाऱ्यांनी व्यापक तयारी केली आहे. आळंदी आणि देहू परिसरात निर्माण झालेल्या पुरसदृश परिस्थितीमुळे अनेक दिंड्या नियोजित वेळेपूर्वीच मार्केटयार्डात पोहोचल्या आहेत. गुळ-भुसार, फळे, भाजीपाला, फुले आणि केळी विभागात वारकऱ्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे.
वारकरी बांधवांसाठी व्यापाऱ्यांकडून चहा, नाश्ता आणि भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून, मुक्कामादरम्यान सर्व व्यापारी आपले व्यवसाय बंद ठेवून वारकरी सेवेत सहभागी होणार आहेत. तसेच भजन-कीर्तनाच्या कार्यक्रमांचाही लाभ घेणार आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता कर्मचारी, औषध फवारणी, कचरा व्यवस्थापन तसेच मोबाईल शौचालयांची व्यवस्था केली आहे. वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी मार्केटयार्ड पोलिसांकडून विशेष सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, वारकऱ्यांचा मुक्काम सुरक्षित आणि सुविधायुक्त होण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे प्रशासनाने सांगितले.