कायद्याचा खून करून शव सत्तेच्या खुर्चीखाली गाडले”……..!

0

जयंत पाटील यांचा सरकारवर आक्रमक हल्लाबोल

(अनंत नलावडे

मुंबई : शुक्रवारी पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेच्या सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी महायुती सरकारवर आरोपांची झोड उठवत राज्यातील कायदा-सुव्यवस्था, भ्रष्टाचार आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.”कायद्याचा खून होऊन त्याचे शव सरकारच्या बहुमताच्या खुर्चीखाली गाडले गेले आहे,” या एका वाक्याने त्यांनी सरकारवर थेट राजकीय हल्ला चढवला खरा मात्र सभागृहात एकच मोठी खळबळ उडाली.

जत गोळीबार प्रकरणातील आरोपीला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाकडून दबाव टाकल्याचा आरोप करत पाटील यांनी वाघमारे दुहेरी हत्याकांड आणि मुख्य साक्षीदाराच्या हत्येचा संदर्भ देत “महाराष्ट्र बिहारच्या दिशेने चाललाय का?” असाही संतप्त सवाल उपस्थित केला.या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

कायदा-सुव्यवस्थेबरोबरच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरही त्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. नागपूरमधील पोलीस प्रकरण,अमली पदार्थांचा वाढता विळखा,भेसळयुक्त दूध, मीरा-भाईंदरमधील कथित एफएसआय घोटाळा,भिवंडीतील भूमाफियांचे अतिक्रमण, नांदेडमधील पूल दुर्घटना आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेचा उल्लेख करत “दोषींना संरक्षण आणि जनतेला आश्वासन” हेच सरकारचे धोरण असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाषणाच्या अखेरीस “पक्ष फोडण्यापेक्षा अमली पदार्थांच्या रॅकेटवर कारवाई करा,” असा थेट टोला लगावत पाटील यांनी आरोग्य, पोलीस आणि महसूल प्रशासनातील कथित ढिसाळ कारभारावरही बोट ठेवले. त्यामुळे पाटील यांच्या आक्रमक भाषणामुळे विरोधकांनाही सरकारला घेरण्यासाठी नवे राजकीय अस्त्र मिळाल्याची चर्चा असून,या गंभीर आरोपांना सरकार सभागृहात आणि सभागृहाबाहेर कोणते उत्तर देते, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech