मुंबई : राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी ऐतिहासिक ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांतर्फे बुधवार, १५ जुलै रोजी जाहीर कृतज्ञता व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी ११ ते ३ या वेळेत हा सोहळा पार पडणार आहे.
विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजनेत ५० हजार रुपयांचा लाभ देण्याची मर्यादा काढून टाकण्यात आली असून अशा शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार असल्याचे जाहीर केले. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करून वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
राष्ट्रीयकृत, व्यापारी, खासगी आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडील माहितीच्या आधारे तयार करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ८५८ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. पूर्वीच्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेत दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असली तरी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसाठी असलेली ५० हजार रुपयांची मर्यादा आणि २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी कोणताही पात्र शेतकरी वंचित राहू नये, ही शासनाची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांनी या सोहळ्याचे आयोजन केले आहे.