कीव : रशियाने पुन्हा एकदा युक्रेनला हादरवून सोडले आहे. गुरुवारी रशियाने युक्रेनची राजधानी कीवसह अनेक भागांवर घातक क्षेपणास्त्रांनी हल्ले केले. विशेष म्हणजे, या हल्ल्याच्या काही वेळ आधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी रशिया मोठ्या हल्ल्याची तयारी करत असल्याचा इशारा दिला होता. कीवच्या लष्करी प्रशासनाच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, रशियाच्या या हल्ल्यात कीवमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. युक्रेनमधील ड्निप्रो आणि क्रिवी रीह ही शहरेही रशियन हल्ल्यांच्या तडाख्यात सापडली आहेत. युक्रेनच्या हवाई दलाने कीववर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले झाल्याची माहिती दिली आहे. तसेच रशियाने लढाऊ विमानांमधून क्रूझ क्षेपणास्त्रांच्या अनेक फेऱ्या डागल्याचेही हवाई दलाने स्पष्ट केले आहे.
हल्ल्यांच्या पहिल्या लाटेनंतर युक्रेनच्या हवाई दलाने आणखी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे कीवच्या दिशेने येत असल्याचा इशारा दिला.कीवचे महापौर यांनीही पुढील हल्ल्यांचा धोका कायम असल्याचे सांगत नागरिकांना सुरक्षित निवाऱ्यांमध्ये (शेल्टरमध्ये) राहण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अलीकडेच युक्रेनमधील सुरू असलेल्या लष्करी कारवाईचे समर्थन करताना रशिया आपली सर्व उद्दिष्टे पूर्ण करेल, असे म्हटले होते.
हल्ल्यापूर्वी केलेल्या एका पोस्टमध्ये राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले होते, “हवाई दलाचे कमांडर अनातोली क्रिवोनोझ्को यांनी मला अहवाल सादर केला आहे. रशियाने काही दिवसांपूर्वीच मोठ्या हल्ल्याची तयारी सुरू केली होती. आज रात्री हा हल्ला होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या सहयोगी देशांनी परिस्थितीचे गांभीर्य पूर्णपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांचे जीव वाचवणे हे ते हवाई संरक्षणासाठी आवश्यक क्षेपणास्त्रांची मदत किती तत्परतेने करतात यावर थेट अवलंबून आहे.
हे विशेषतः अमेरिका आणि पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणाली उपलब्ध असलेल्या इतर सहयोगी देशांवर लागू होते.आमच्या सुरक्षेसाठी ही प्रणाली पुरविण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. प्रत्येक सहयोगी देशाला नेमकी कोणती मदत आवश्यक आहे याची जाणीव आहे आणि विलंबाचे परिणाम काय होऊ शकतात हेही त्यांना चांगले माहीत आहे. कृपया युक्रेनमधील सर्व भागांमध्ये जारी करण्यात आलेल्या हवाई हल्ला इशाऱ्यांकडे (एअर रेड अलर्ट) लक्ष द्या आणि सुरक्षित राहा.”