नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह २२ नोव्हेंबरपासून भारत दौऱ्यावर; मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा

0

नवी दिल्ली : नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह २२ नोव्हेंबरपासून भारताच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. २७ मार्च रोजी पदभार स्वीकारल्यानंतरचा हा त्यांचा पहिला अधिकृत द्विपक्षीय परदेश दौरा असेल.यापूर्वी सप्टेंबरमध्ये ते संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेला गेले होते. आता त्यांच्या भारत दौऱ्याबाबत दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार का, यावर विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.

नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी सांगितले की, बालेन्द्र शाह ३४ सदस्यीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. या प्रतिनिधिमंडळात अर्थमंत्री स्वर्णिम वागले आणि परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल यांचाही समावेश असेल. पंतप्रधानांचे मुख्य सल्लागार कुमार ब्यंजनकर तसेच अन्य वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत असतील. भारत दौऱ्यादरम्यान नेपाळचे पंतप्रधान शाह भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतील, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावर चर्चा करतील. परराष्ट्र सचिवांनी सांगितले की, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे देखील बालेन्द्र शाह यांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, या उच्चस्तरीय चर्चेत संपर्क यंत्रणा आणि पायाभूत सुविधांच्या विकासासह व्यापार, पारगमन, ऊर्जा आणि गुंतवणूक अशा क्षेत्रांतील आर्थिक सहकार्य वाढवण्यासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा होईल. द्विपक्षीय बैठकीदरम्यान शिक्षण, आरोग्य, कृषी, अंतराळ, आपत्ती व्यवस्थापन आणि मानव संसाधन विकास यांसारख्या क्षेत्रांतील सामंजस्य करारांची देवाणघेवाणही केली जाणार आहे. पंतप्रधानांच्या प्रतिनिधीमंडळासोबत एक स्वतंत्र व्यापारी प्रतिनिधीमंडळही भारत दौऱ्यावर येणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech