अवैध गर्भपात प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होणार : आरोग्यमंत्री

0

कोल्हापुरातील घटनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक

कोल्हापूर : पुरोगामी महाराष्ट्रातील लोकराजा शाहू महाराजांच्या भूमीत अवैध गर्भपातासारखे घृणास्पद कृत्य घडणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या प्रकरणात जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिला. कदमवाडी रोडवरील एका रुग्णालयात निवृत्त सिव्हिल सर्जन अवैध गर्भपात करताना पोलिसांना आढळून आल्यानंतर आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची आढावा बैठक घेतली.

या बैठकीस आमदार अमल महाडीक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगुले आणि पीसीपीएनडीटी समितीच्या ॲड. गौरी पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, मातेच्या गर्भातील निष्पाप जीवांना धोका निर्माण करणारे प्रकार जिल्ह्यात कुठेही सुरू असतील तर ते तातडीने थांबविण्यात यावेत. अशा सर्व ठिकाणांचा शोध घेऊन पोलिसांनी कारवाई करावी तसेच दोषींना कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून भविष्यात असे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही.

दरम्यान, आमदार अमल महाडीक यांनी शहरात घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील फार्मासिस्टची स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना केली. तसेच संशयास्पद ठिकाणांची यादी पीसीपीएनडीटी समितीने प्रशासनाला द्यावी, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी संशयास्पद ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडून अचानक तपासणी (सरप्राईज व्हिजिट) करण्यात येईल, असे स्पष्ट केले. बैठकीच्या प्रारंभी ऍड. गौरी पाटील यांनी जिल्ह्यातील नोंदणीकृत सोनोग्राफी केंद्रांची माहिती दिली. तसेच पीसीपीएनडीटी समितीच्या कारवाईसाठी पोलीस विभागाकडून नेहमीच सहकार्य मिळत असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस विभागाचे अधिकारी तसेच पीसीपीएनडीटी समितीचे सदस्य उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech