नाशिक : त्र्यंबकेश्वर मध्ये ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याने कुंभपर्वाचा शंखनाद होणार असला, तरी कुंभनगरीत मात्र प्रशासकीय अनास्थेचा कळस पाहायला मिळत आहे. कोट्यवधी भाविक आणि देशभरातील आखाड्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी सज्ज राहणाऱ्या नाशिकमध्ये अद्याप सिंहस्थाची ठाेस कामे पूर्ण झालेली आहे. नाशिकनंतर होणाऱ्या उज्जैनच्या कुंभमेळ्याची तयारी युद्धपातळीवर सुरू असताना, नाशिकचे प्रशासन मात्र कामे अद्यापही संथगतीने सुरु आहे. प्रशासनाच्या या भाेंगळ कारभारावर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ते संजयदासजी महाराज यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली
तसेच “तपोवनात जर साधूग्रामसाठी वेळेत जागाच दिली नाही, तर कुंभमेळा कुठे करायचा? हा सनातन धर्माचा सर्वोच्च सोहळा असून प्रशासनाने संथ कारभार सोडून त्वरित निर्णय घ्यावा,” अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना फटकारले. ध्वजाराेहणच्या पार्श्वभुमीवर वैष्णव पथांचे साधू महंत शहरात दाखल आहे. कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभुमीवर बुधवारी दि. २८ महंत संजय दास महाराज यांच्या पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. यावेळी त्यांनी सांगितले.
यंदा आखाड्यांच्या खालशांची संख्या तब्बल १०१० वर पोहोचली आहे. त्यामुळे साधू-महंत आणि भाविकांच्या सोयीसाठी मोठ्या जागेची गरज आहे. प्रशासनाने जागा देण्याचे आश्वासन दिले हाेते. मात्र प्रत्यक्षात आजही साधूग्रामसाठी आवश्यक ती जागा उपलब्ध झालेली नाही. उज्जैनमध्ये कुंभमेळ्याच्या तयारीने गती पकडलेली असताना, नाशिकमधील मात्र कामे पूर्ण झालेली नाही. तपोवनातील साधूग्रामसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित करण्याचे केवळ नियोजन कागदावरच फिरत आहे. यावर बोलताना संजयदासजी म्हणाले की, “शासनाने चालढकल थांबवून तातडीने कठोर पावले उचलावीत. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी साधूग्रामसाठी घेतल्या जाणार आहेत, त्यांना विनाविलंब योग्य मोबदला हातात द्यावा, जेणेकरून कामाला तात्काळ सुरुवात होईल.