जम्मू : जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि यात्रेच्या मार्गांवर पाऊस, भूस्खलन, दगड कोसळणे आणि इतर अडथळ्यांची शक्यता लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने श्री अमरनाथ यात्रा थांबविण्याचा आदेश देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, रामबन जिल्ह्यात आणि काश्मीरच्या काही भागांत पाऊस व खराब हवामानामुळे शनिवारी जम्मूहून श्री अमरनाथ यात्रा थांबविण्यात आली. सध्याचे हवामान आणि रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी जम्मूच्या भगवती नगर बेस कॅम्पमधून यात्रेकरूंच्या कोणत्याही नव्या जत्थ्याला रवाना होण्याची परवानगी देण्यात आली नाही.
दरम्यान, पवित्र गुहेत दर्शन घेऊन बालटाल बेस कॅम्पमध्ये थांबलेल्या १,२०२ यात्रेकरूंच्या २८ व्या जत्थ्याला ४४ वाहनांमधून जम्मूच्या दिशेने येण्याची परवानगी देण्यात आली. परतणाऱ्या यात्रेकरूंमध्ये ८६७ पुरुष, २५१ महिला, एक बालक, ७९ साधू आणि चार साध्वींचा समावेश आहे. अधिकारी जम्मूहून यात्रेकरूंच्या पुढील हालचालीला परवानगी देण्यापूर्वी हवामान आणि रस्त्यांच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.