नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने कॉकरोच जनता पार्टीचा (सीजेपी) ५ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणारा प्रस्तावित मोर्चा थांबवण्यास नकार दिला आहे. १२-१३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषद आणि त्यानंतरच्या कालावधीसाठी स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सध्या कोणतीही अनुचित घटना घडेल असे मानण्यास सबळ कारण नाही. निवृत्त पोलीस अधिकारी राजेंद्र सिंह यांच्या वतीने दाखल केलेल्या या याचिकेसाठी वकील सय्यद रिझवान हजर होते.
दरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी म्हटले आहे की, प्रशासनाकडून अपेक्षा आहे की ते कायदा व सुव्यवस्था राखतील आणि सर्व पक्षांनी जबाबदारीने व कायद्यानुसार काम करावे याची खात्री करतील. संभाव्य अनुचित घटनेच्या भीतीने याचिकाकर्त्याने न्यायालयाच्या हस्तक्षेपाची मागणी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ हस्तक्षेप करण्यास नकार दिला आणि याचिकाकर्त्याला आपली बाजू केंद्र सरकारसमोर मांडण्याचे व याचिकेची एक प्रत सॉलिसिटर जनरल यांना देण्याचे निर्देश दिले. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी मुख्य खटल्यासोबत सुनावणी होणार आहे.
वकील रिझान अहमद यांनी न्यायालयाला ३ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्याची विनंती केली. त्यांनी १२-१३ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणाऱ्या ‘ब्रिक्स’ परिषदेचा उल्लेख केला. यावेळी अनेक आंतरराष्ट्रीय मान्यवर आणि मीडिया राजधानीत असणार आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. अहमद यांनी सांगितलं की, त्यांच्या माहितीनुसार आयोजकांनी मोर्चासाठी पोलिसांची परवानगी घेतलेली नाही. मात्र, सरन्यायाधीशांनी स्पष्ट केलं की, काहीतरी वाईट घडेल या शक्यतेवर न्यायालय कारवाई करू शकत नाही. कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. सरन्यायाधीश म्हणाले, “आमच्यासमोर कोणताही विशिष्ट गट नाही. तुम्ही केंद्र सरकार किंवा दिल्ली सरकारला सांगा. कायदा-सुव्यवस्था राखणं हे त्यांचं काम आहे. त्यांनी कायद्यानुसार कारवाई करावी.
अभिजीत दीपके केंद्र सरकारवर आश्वासने मोडल्याचा आरोप
अभिजीत दीपके यांच्या सीजेपी पक्षाने केंद्र सरकारवर आश्वासने मोडल्याचा आरोप केला आहे. २४ ऑगस्ट रोजी सीजेपीने म्हटले की, २५ जुलै रोजी तरुणांना दिलेली आश्वासने, विशेषतः विद्यार्थी आणि आंदोलकांविरुद्ध दाखल केलेले एफआयआर मागे घेण्यासंबंधीची आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. पक्षाने म्हटले, आश्वासने पूर्ण करण्यात सरकारकडून होणारा सततचा विलंब आणि दिरंगाई लक्षात घेता, सीजेपी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीने लोकांना शांततापूर्ण मार्गाने संघटित करण्याची मोहीम पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ५ सप्टेंबर रोजी, सीजेपी नवी दिल्लीतील इंडिया गेटपासून दिल्ली पोलीस मुख्यालयापर्यंत एका शांततापूर्ण युवा मोर्चाचे आयोजन करेल.