भाजपा राज्य कार्यकारिणी बैठकीचा समारोप
पुणे : काँग्रेसने माओवादापासून स्फूर्ती घेत खोटेनाटे सांगत देशात अराजक माजवण्याचा विडा उचलला आहे. काँग्रेससारख्या विरोधकांकडून फेक नरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग सुरु आहेत. या विरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी लढण्यासाठी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुणे येथे केले. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश २०४७ पर्यंत विकसित भारत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना महाराष्ट्र २०३० पर्यंत तीन ट्रिलियनची अर्थव्यवस्था करून महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाचे स्वप्न पूर्ण करू, असा निर्धार व्यक्त करत आणि महायुतीचे सरकार संकटांना सामोरे जात राज्यात परिवर्तन घडवेल, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला .
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक मंत्री ॲड. आशिष शेलार, पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे, जलसंधारण मंत्री गिरीश महाजन तसेच राज्य मंत्रिमंडळातील गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संजय सावकारे, अतुल सावे, माधुरी मिसाळ आदी मंत्री, भाजपा राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. अमित साटम, माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, सुधीर मुनगंटीवार आदी या कार्यकारिणी बैठकीला उपस्थित होते.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अंतिम भाषणात अराजकतेचे संकट आपल्याला समजावून सांगितले. आज तेच अराजकतेचे संकट त्याच संविधानाचे नाव घेऊन आपल्याविरुद्ध वापरण्याचा प्रयत्न आहे. हे केवळ भाजपाच्या विरुद्ध नाही तर बृहद समाजाविरुद्ध याचा वापर होत आहे. नाव संविधानाचे घ्यायचे आणि संविधानाचे मूल्य पायदळी तुडवून अराजकता पसरवण्याचे काम चालले आहे. पण कोणी संविधानाचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात जळाल्याशिवाय राहणार नाही, असे फडणवीस यांनी सुनावले.