नाशिक : सिंहस्थ महाकुंभाच्या विकासकामांवर खर्च होणारा पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे हा पैसा कुठे आणि कसा खर्च केला जात आहे, याचा जाब विचारण्याचा अधिकार जनता तसेच विरोधी पक्षांना आहे. हे पैसे मुख्यमंत्र्यांच्या घरचे नाहीत. सिंहस्थाची कामे करताना सत्ताधाऱ्यांनी जनतेला विश्वासात घेतलेच पाहिजे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही भाजपला या खर्चाचा जाब विचारणारच, असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला. काँग्रेस पक्षाचे गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये निवासी प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. या शिबिराच्या निमित्ताने चव्हाण सोमवारी (दि. ३१) नाशिकमध्ये आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सिंहस्थ कुंभमेळ्याला विरोधी पक्षांकडून बदनाम केले जात असल्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप चव्हाण यांनी फेटाळून लावला.
विरोधी पक्ष म्हणून जनतेशी संबंधित प्रश्न विचारण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. कुंभमेळ्याच्या कामांसाठी खर्च केला जाणारा निधी सत्ताधाऱ्यांच्या घरातील नसून जनतेचा आहे. त्यामुळे तो कुठे आणि कशाप्रकारे खर्च होत आहे, याचा हिशोब मागण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. नाशिकसाठी मिळणाऱ्या निधीतून शहराचा आणि जिल्ह्याचा विकास झालाच पाहिजे. मात्र, या निधीचा वापर नेमका कसा केला जात आहे, हे जाणून घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.