अर्नब चक्रीवादळाचा आंध्र प्रदेशला तडाखा; एनडीआरएफची ३९ पथके तैनात

0

नवी दिल्ली : चक्रीवादळ ‘अर्नब’ने पुडुचेरीतील यानमजवळून किनारा ओलांडला आहे. पुढील सहा तासांत त्याचे चक्रीवादळात आणि संध्याकाळपर्यंत तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका आंध्र प्रदेशला बसला असून, येथे तीन जणांचा मृत्यू झाला आहे आणि ३१ घरांचे नुकसान झाले आहे. राज्यातील हजारो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) महानिरीक्षक नरेंद्र सिंह बुंदेला यांनी बुधवारी सांगितले की, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिशाचा दक्षिण भाग चक्रीवादळामुळे सर्वाधिक प्रभावित झाला आहे. आंध्र प्रदेशात तीन जणांचा मृत्यू झाला असून, ३१ घरांचे नुकसान झाले आहे. राज्यातील सुमारे ५७ हजार नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.

बुंदेला यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, चक्रीवादळाची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने एनडीआरएफ आणि संरक्षण दलांच्या मदतीने मंगळवारी रात्री आंध्र प्रदेशात चार अतिरिक्त पथके पाठवली. भारतीय हवाई दलाच्या विमानांद्वारे या पथकांना तेथे पोहोचवण्यात आले. दोन्ही राज्यांमध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके मदत आणि बचावकार्यात गुंतली आहेत. आंध्र प्रदेश सरकारने एसडीआरएफची ८० पथके तैनात केली आहेत.

ते म्हणाले की, आंध्र प्रदेश आणि ओडिशासह छत्तीसगड, झारखंड, तेलंगणा, पुडुचेरी आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहात एनडीआरएफची एकूण ३९ पथके तैनात आहेत. प्राथमिक अहवालानुसार, ओडिशामध्ये चक्रीवादळाचा कोणताही गंभीर परिणाम झालेला नाही. आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वाऱ्यांसह पाऊस सुरू आहे. यानममध्ये पावसामुळे अडकलेल्या ३८ नागरिकांना मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech