भारताला डिवचाल, तर चोख प्रत्युत्तर मिळेल – राजनाथ सिंह

0

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फिलिपिन्समधील सेबू येथे १३व्या आसियान संरक्षणमंत्र्यांच्या बैठकीदरम्यान (एडीएमएम-प्लस) आज, बुधवारी भारतीय समुदायाला संबोधित केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा, आर्थिक प्रगती, संरक्षण क्षमता आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांवर भाष्य केले. राजनाथ सिंह म्हणाले की, जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा आणि संरक्षण सज्जता वाढली आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, भारत कधीही कोणाला डिवचत नाही; मात्र, कोणी भारताला डिवचले, तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाते.राजनाथ सिंह म्हणाले, “जगभरात भारताची प्रतिष्ठा वाढली आहे. तसे नसते, तर ३५ देशांच्या नेतृत्वाने आपल्या पंतप्रधानांना त्या देशांचे सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवले नसते. आज भारत बोलतो, तेव्हा संपूर्ण जग लक्षपूर्वक ऐकते.”

जागतिक सहकार्याबाबत भारताच्या दृष्टिकोनावर भाष्य करताना राजनाथ सिंह म्हणाले की, संपूर्ण जगाला आपले कुटुंब मानणारा भारत हा एकमेव देश आहे. आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजेच ‘संपूर्ण जग एक कुटुंब आहे’, ही संकल्पना मानतो. ते म्हणाले, “आपले मन इतके विशाल आहे की, आपण नागपंचमीच्या दिवशी सापांनाही दूध पाजतो.”भारताच्या आर्थिक प्रगतीबाबत बोलताना राजनाथ सिंह यांनी सांगितले की, भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. भविष्यात भारताची स्थिती आणखी सुधारेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, “जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा सध्या पाचवा क्रमांक आहे. पश्चिम आशियात संकट निर्माण झाले नसते, तर आपण आतापर्यंत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले असते. असो, हे घडणारच आहे.” भारताच्या सुरक्षेला असलेल्या धोक्यांना दिल्या जाणाऱ्या प्रत्युत्तराचा उल्लेख करताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा दाखला दिला. ते म्हणाले, “तुम्ही ‘ऑपरेशन सिंदूर’चे नाव ऐकलेच असेल. आपला देश आता कमकुवत राहिलेला नाही. आपण कोणालाही डिवचत नाही; मात्र, कोणी आपल्याला डिवचले, तर त्याला सोडत नाही. हा संदेश आता अगदी स्पष्ट आहे. आपली संरक्षण सज्जता अधिक मजबूत झाली आहे.”यापूर्वी शौर्य दिनानिमित्त राजनाथ सिंह यांनी देशाच्या वीर जवानांना अभिवादन केले होते. यावेळी त्यांनी देश त्यांच्या बलिदानाचा सदैव ऋणी राहील, असे म्हटले होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech