आदिवासी संस्कृती आणि अस्मिता जपत विकास साधावा – राज्यपाल

0

* गडचिरोली महाराष्ट्राच्या विकासात पहिला जिल्हा बनेल – मुख्यमंत्री- गडचिरोलीला प्रमुख ‘स्टील हब’ बनविणार – उपमुख्यमंत्री शिंदे

गडचिरोली : आदिवासी समाजाचा विकास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि उपजीविकेच्या समान संधी उपलब्ध करून देतानाच त्यांची संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.

भगवान बिरसा मुंडा यांनी जल, जंगल आणि जमिनीवरील हक्कांसाठी केलेला संघर्ष आणि सामाजिक जागृतीचे कार्य आजही प्रेरणादायी आहे. आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय सन्मान मिळवून देण्यासाठी जनजातीय गौरव दिनाचे आयोजन महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठांच्या माध्यमातून ‘स्कूल कनेक्ट’ उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आदिवासी समाजाच्या पारंपरिक लोककला, नृत्य, संगीत आणि हस्तकलेचे संवर्धन करून कलाकारांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. पीएम जनमन आणि धरती आबा अभियानाच्या माध्यमातून विकासाचा लाभ शेवटच्या आदिवासी गावापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राज्यपालांनी केले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech