स्वदेशी उत्पादनाला मिळणार बळ; नॅशनल हेवी इंजिनिअरिंगमध्ये २०२७ अखेरपर्यंत उत्पादनाचे उद्दिष्ट -अमित शहा

0

पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या तळेगाव येथील नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सहकारी संस्थेचे पुनरुज्जीवन करण्यात येत असून, डिसेंबर २०२७ पूर्वी या संस्थेत उत्पादन सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे स्वदेशी यंत्रनिर्मितीला चालना मिळण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि यंत्रसामग्रीची आयात कमी होण्यास मदत होईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शहा यांनी केली. तळेगाव दाभाडे येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड सोसायटीच्या भूमिपूजन समारंभासह सहकारी संस्थांच्या निबंधक प्रादेशिक कार्यालयाचे उद्घाटन आणि ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाचे कार्यकारी संचालक संजय करमचंदानी, सहकार मंत्रालयाचे अपर सचिव पंकज कुमार बन्सल, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. अमित शहा म्हणाले, तळेगावातील ११० एकरांवर विस्तारलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेत पूर्वी साखर कारखान्यांसाठी लागणारी यंत्रसामग्री तयार करून भारतासह अनेक देशांना पुरवली जात होती. मात्र, ही संस्था बंद पडल्यानंतर तिच्या पुनरुज्जीवनासाठी केंद्रीय सहकार मंत्रालयाने पुढाकार घेतला.

या प्रक्रियेत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळ, अमूल, इफ्को, एनसीडीसी, नाफेड यांसह विविध सहकारी संस्थांनी गुंतवणूक केली. संस्थेचे संचालक मंडळ नव्याने गठित करण्यात आले. दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले लेखापरीक्षण पूर्ण करण्यात आले असून, कर्जफेडीसाठीही नियोजन करण्यात आले आहे. पुनरुज्जीवित संस्थेत साखर कारखान्यांची यंत्रसामग्री, वीजनिर्मितीची उपकरणे, इथेनॉल आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस (सीबीजी) प्रकल्पांसाठी लागणारी यंत्रे तसेच दुग्धव्यवसायासाठी आवश्यक उपकरणे तयार केली जाणार आहेत. साखर उत्पादनातील प्रत्येक घटकाचा उपयोग करून आयात कमी करणारी चक्रीय अर्थव्यवस्था उभारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गायीच्या शेणापासूनही शेतकरी आणि देशासाठी आर्थिक उत्पन्न निर्माण करता येईल, असे शहा यांनी स्पष्ट केले.

पुढील टप्प्यात रेल्वे, संरक्षण क्षेत्र आणि निर्यातीसाठी लागणाऱ्या कंटेनरची निर्मिती करण्याचेही नियोजन आहे. डिसेंबर २०२७ पूर्वी प्रत्यक्ष उत्पादन सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. भारत टॅक्सी हा चालकांच्या सहकारी मालकीचा उपक्रम असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. खासगी टॅक्सी कंपन्यांकडून चालकांना मिळणाऱ्या कमिशनच्या पार्श्वभूमीवर सहकारी तत्त्वावर हा पर्याय उभा करण्यात आला आहे. या सेवेमध्ये कमिशन न कापता प्रवासाचे पैसे थेट चालकांच्या खात्यात जमा होतील, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबई, नाशिक आणि पुणे येथे या सेवेची सुरुवात झाली असून, आगामी काळात देशातील अन्य शहरांमध्येही तिचा विस्तार करण्याचे नियोजन आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech