नवी दिल्ली : सिटी युनियन बँकेने आपल्या भागधारकांना बोनस शेअर्स देण्यासाठी रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. बँकेच्या विद्यमान भागधारकांना त्यांच्या मालकीच्या प्रत्येक तीन शेअर्समागे एक बोनस शेअर दिला जाणार आहे. यासाठी बँकेने १२ जून ही रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केली आहे. रेकॉर्ड डेट म्हणजे बोनस शेअर्स जारी करण्यासाठी आधार मानली जाणारी तारीख. त्या तारखेपर्यंत ज्यांची नावे कंपनीच्या ‘रजिस्टर ऑफ मेंबर्स’मध्ये किंवा डिपॉझिटरीजच्या नोंदींमध्ये लाभार्थी मालक म्हणून नोंदलेली असतील, त्यांनाच बोनस शेअर्सचा लाभ मिळणार आहे. सिटी युनियन बँकेने एप्रिल महिन्यात जानेवारी ते मार्च २०२६ या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना बोनस इश्यूची घोषणाही केली होती.
बँकेने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर बोनस शेअर्स जारी करण्यात येतील. सिटी युनियन बँक तब्बल आठ वर्षांनंतर बोनस इश्यू आणत आहे. यापूर्वी २०१८ मध्ये बँकेने प्रत्येक १० शेअर्समागे एक बोनस शेअर जारी केला होता. सिटी युनियन बँकेच्या शेअरचे सध्याचे दर्शनी मूल्य (फेस व्हॅल्यू) एक रुपये आहे. शुक्रवारी बँकेचा शेअर २४४.७० रुपयांच्या पातळीवर बंद झाला होता. हा शेअर सध्या बीएसई ५०० निर्देशांकाचा भाग आहे. गेल्या एका वर्षात या शेअरच्या किमतीत सुमारे २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. शेअरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे सिटी युनियन बँकेचे बाजार भांडवल (मार्केट कॅप) १८,१०० कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
बोनस शेअर्स जारी करण्याबरोबरच सिटी युनियन बँक आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी प्रति शेअर दोन रुपयांचा लाभांश (डिव्हिडंड) देखील देणार आहे. मात्र, लाभांशासाठी अद्याप रेकॉर्ड डेट जाहीर करण्यात आलेली नाही. बँकेच्या माहितीनुसार, लाभांशाचे वितरणही वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतरच करण्यात येईल. यापूर्वी आर्थिक वर्ष २०२४-२५ साठीही बँकेने प्रति शेअर दोन रुपयांचा लाभांश दिला होता.