मुंबई : वाहन निर्माता कंपनी टोयोटाने सणासुदीच्या काळात वाहनांची विक्री वाढवण्यासाठी २०२६ टोयोटा फॉर्च्युनरचे नवे लीडर एडिशन लाँच केले आहे. या विशेष आवृत्तीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ३६.५१ लाख रुपये असून, मॅन्युअल व्हेरिएंटसाठी ही किंमत निश्चित करण्यात आली आहे. ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत ३८.७२ लाख रुपये आहे. या नव्या एडिशनच्या बुकिंगला १२ ऑक्टोबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. नव्या फॉर्च्युनर लीडर एडिशनच्या बाह्य आणि अंतर्गत रचनेत काही आकर्षक बदल करण्यात आले आहेत. मात्र, इंजिन आणि तांत्रिक वैशिष्ट्यांच्या बाबतीत ही गाडी फॉर्च्युनरच्या स्टँडर्ड टू-व्हील ड्राइव्ह म्हणजेच ४ बाय २ व्हेरिएंटसारखीच आहे. यापूर्वी २०२४ आणि २०२५ मध्येही फॉर्च्युनरचे लीडर एडिशन सादर करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी ते डीलर स्तरावर उपलब्ध असलेले विशेष पर्याय होते.
नव्या लीडर एडिशनमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन पर्याय देण्यात आले आहेत. ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत मॅन्युअलपेक्षा २.२१ लाख रुपये अधिक आहे. ग्राहकांना सुपर व्हाइट, प्लॅटिनम व्हाइट पर्ल आणि अॅटिट्यूड ब्लॅक या तीन रंगांमध्ये ही गाडी खरेदी करता येईल. यापूर्वी उपलब्ध असलेला सिल्व्हर मेटॅलिक रंग नव्या आवृत्तीत देण्यात आलेला नाही. बाह्य रचनेत काळ्या रंगाची वेगळी फ्रंट ग्रिल, काळ्या आणि सिल्व्हर रंगाच्या ट्रिमसह आकर्षक फ्रंट बंपर तसेच बोनेटवर मोठ्या अक्षरांत ‘टोयोटा’ असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय, काळ्या रंगाची १८ इंची अलॉय व्हील्स, ड्युअल-टोन काळे रूफ आणि टेलगेटवरील काळ्या रंगाची ट्रिम यामुळे गाडीला अधिक आकर्षक लूक मिळतो.
गाडीच्या इंटिरिअरमध्ये काळ्या आणि मरून रंगाच्या ड्युअल-टोन अपहोल्स्ट्रीसह त्याला साजेसे डोअर ट्रिम्स देण्यात आले आहेत. तसेच अॅम्बियंट लाइटिंग आणि इल्यूमिनेटेड डोअर सिल्स यांचाही समावेश आहे. ऑटो-फोल्डिंग ओआरव्हीएम म्हणजेच बाहेरील रिअर व्ह्यू मिरर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम ही अन्य महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. इंजिनच्या बाबतीत या गाडीत चार सिलिंडरचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. सहा-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह हे इंजिन २०४ हॉर्सपॉवरची ताकद आणि ५०० एनएम टॉर्क निर्माण करते. सहा-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सच्या पर्यायात टॉर्क ४२० एनएम आहे. विशेष म्हणजे, २०२६ टोयोटा फॉर्च्युनर लीडर एडिशन केवळ ४ बाय २ टू-व्हील ड्राइव्ह प्रकारात उपलब्ध असेल.