मुंबई : बॉबी देओल हे बॉलिवूडमधील त्या सुपरस्टार्सपैकी एक आहेत, ज्यांच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अशातच बॉबी देओल त्यांच्या नव्या चित्रपटामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. अलीकडेच त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘बंदर’ या चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची घोषणा करण्यात आली असून, त्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. पोस्टर समोर येताच चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ‘बंदर’ हा चित्रपट ५ जून २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नवी कथा आणि दमदार कलाकारांसह हा चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असल्याची चर्चा आहे.विविध भूमिकांमधून प्रशंसा मिळवल्यानंतर आता बॉबी देओल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग कश्यप करत आहेत, जे त्यांच्या वेगळ्या आणि प्रभावी कथांसाठी ओळखले जातात.
बॉबी देओल यांच्यासोबत या चित्रपटात सान्या मल्होत्रा, राज बी शेट्टी, जितेंद्र जोशी, सपना पब्बी, इंद्रजीत सुकुमारन, रिद्धी सेन, सबा आझाद आणि नागेश भोसले हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.अनुराग कश्यप यांनी यापूर्वी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ आणि ‘ब्लॅक फ्रायडे’सारख्या कल्ट क्लासिक चित्रपटांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.या चित्रपटाचे लेखन सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी केले असून, प्रेक्षकांना हा एक वेगळा अनुभव देणारा चित्रपट ठरणार आहे. चित्रपटाची निर्मिती निखिल द्विवेदी यांनी केली असून, तो झी स्टुडिओजच्या बॅनरखाली तयार करण्यात येत आहे.सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी ‘पाताल लोक’, ‘कोहरा’ आणि ‘उडता पंजाब’सारख्या प्रकल्पांमध्येही उत्कृष्ट काम केले आहे. इतकी दमदार आणि प्रतिभावान टीम या चित्रपटामागे असल्याने चाहते या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक आहेत.