अलिबागमध्ये ३ मे रोजी ‘गीत जगदीश’; शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांना स्वरांजली

0

रायगड : मराठी गीतसृष्टीतील अजरामर गीतांचे शब्दप्रभू स्व. जगदीश खेबुडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी अलिबागमध्ये विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्व. जगदीश खेबुडकर फाउंडेशनच्या वतीने रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता पीएनपी नाट्यगृह येथे ‘गीत जगदीश’ हा कार्यक्रम रंगणार आहे.

मराठी संगीतविश्व समृद्ध करणाऱ्या खेबुडकर यांच्या गीतांनी अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या गीतांतील साधेपणा, भावस्पर्शी शब्दरचना आणि लोकजीवनाशी असलेली घट्ट नाळ यामुळे त्यांची गाणी आजही रसिकांच्या ओठांवर कायम आहेत. त्यांच्या या अमूल्य योगदानाला स्वरांजली वाहण्यासाठी त्यांचे सुपुत्र व फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुल जगदीश खेबुडकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात गाण्यांची मैफल तर असेलच, पण मुलाखतीच्या माध्यमातून खेबुडकर यांच्या जीवनप्रवासाचाही वेध घेण्यात येणार आहे. ‘जगदीश खेबुडकर ते द जगदीश खेबुडकर’ असा त्यांचा प्रवास, गाण्यांच्या निर्मितीमागील कथा आणि आठवणी रसिकांसमोर उलगडल्या जाणार आहेत.

नामांकित गायक-गायिका आणि वाद्यवृंद कलाकारांच्या सहभागामुळे ही संगीतमय मैफल अधिक रंगतदार होणार आहे. सांस्कृतिक जतन, नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि मायमराठीचा वारसा जपणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, आसनव्यवस्था ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राहणार आहे. अलिबाग व परिसरातील संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या स्वरमैफलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech