प्युर्टो रिकोमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
जयपूर : केरळची १९ वर्षीय काझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२६ ’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. राजस्थानची राजधानी जयपूर येथे झालेल्या भव्य अंतिम सोहळ्यात काझियाच्या नावाची विजेती म्हणून घोषणा करण्यात आली. ‘मिस युनिव्हर्स इंडिया २०२५ ’ची विजेती मानिका विश्वकर्मा हिने काझियाला मुकुट परिधान करून आपल्या उत्तराधिकारिणीकडे हा प्रतिष्ठित किताब अधिकृतपणे सोपवला. या विजयासोबतच काझियाला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची मोठी संधी मिळाली आहे. नोव्हेंबर २०२६ मध्ये प्युर्टो रिको येथे होणाऱ्या ७५ व्या ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय किताब जिंकल्यानंतर आता तिच्यासमोर आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याचे आव्हान असणार आहे.
यंदाच्या अंतिम स्पर्धेत एकूण ५२ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. अनेक महिन्यांच्या ऑडिशन्स, मुलाखती आणि विविध प्राथमिक फेऱ्यांनंतर या स्पर्धकांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. अंतिम टप्प्यात केरळच्या काझिया लिझ मेजोसोबत तामिळनाडूची वैष्णवी गणेश, गुजरातची अनुश्री सातवळेकर, महाराष्ट्राची तेजस्विनी श्रीवास्तव आणि उत्तराखंडची अनुभा वशिष्ठ या स्पर्धकांनी टॉप ५ मध्ये स्थान मिळवले. अंतिम फेरीत काझियाने ४० सेकंदांत समारोपाचे भाषण सादर करण्याचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले. तिच्या आत्मविश्वासपूर्ण कामगिरीने परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले आणि अखेरीस तिला विजेतेपद मिळाले. अंतिम निकालात तामिळनाडूची वैष्णवी गणेश आणि गुजरातची अनुश्री सातवळेकर यांनी अनुक्रमे पुढील दोन स्थाने पटकावली.
या स्पर्धेच्या अंतिम परीक्षणासाठी भारताची पहिली ‘मिस युनिव्हर्स’ सुष्मिता सेन हिच्या नेतृत्वाखाली प्रतिष्ठित ज्युरी पॅनेल उपस्थित होते. सुष्मिता सेनने १९९४ मध्ये भारतासाठी ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिंकला होता. याशिवाय माजी ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ विजेत्या सेलिना जेटली, उर्वशी रौतेला आणि रिया सिंघा यांच्यासह प्रज्ञा कपूर, विशा लाढिया, ॲना ब्लँको, डॉ. स्तुती खरे शुक्ला आणि ग्लॅमानंद ग्रुपचे अध्यक्ष यांचा ज्युरीमध्ये समावेश होता. काझिया लिझ मेजोच्या या विजयामुळे केरळसह संपूर्ण भारतात तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, आता प्युर्टो रिकोमध्ये होणाऱ्या जागतिक स्पर्धेत तिच्या कामगिरीकडे देशाचे लक्ष लागले आहे.