‘मांजर’च्या पोस्टरने वाढवलं कुतूहल; १८ सप्टेंबरला होणार उलगडा

0

मुंबई : तीन मित्र… घरभर पसरलेला पसारा… आणि या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी त्यांची मैत्रीण! याच भन्नाट कुतूहलाची झलक दाखवत ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. हे दृश्य पाहिल्यावर प्रश्न पडतोच, ‘मांजर’ आणि या सगळ्याचा काय संबंध आहे. घरातला पसारा, बिनधास्त मित्रांची गँग, त्यांचं बेफिकीर जगणं आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी असलेली मुलगी… या चित्रातून ‘मांजर’ ही केवळ चार मित्रांची गोष्ट नसून हसवणाऱ्या आणि गोंधळात टाकणाऱ्या घटनांची धमाल कॉमेडी असल्याची झलक मिळते. पोस्टरमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी भन्नाट किस्सा दडलेला आहे की काय, अशी उत्सुकता निर्माण झाली आहे.

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित ‘मांजर’चं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. चित्रपटात सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पोस्टरमध्ये या चौघांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळते. पोस्टरमध्ये घरातील अस्ताव्यस्त पसारा लक्ष वेधून घेतो. कपडे, मोबाईल, लॅपटॉप, इअरफोन्स, बॅग्ज आणि रोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये तीन मित्र अक्षरशः बिनधास्त लोळताना दिसतात. या सगळ्या गोंधळाच्या मध्यभागी भाग्यश्री मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं. या ‘मांजर’ या नावाभोवती नेमकं काय घडलंय आणि त्यातून या मित्रांच्या निवांत विश्वात कोणता गोंधळ निर्माण झाला आहे, याचं उत्तर पोस्टर देत नाही; उलट उत्सुकता आणखी वाढवतं.

दिग्दर्शक सुशील महादेव म्हणतात, “‘मांजर’मध्ये चार मित्रांचं मोकळंढाकळं विश्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भन्नाट परिस्थिती पाहायला मिळणार आहेत. मांजर हा त्यांच्या जगाचा आधीपासूनच एक भाग आहे; मात्र त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात मजेशीर परिस्थिती निर्माण होते. पात्रांची केमिस्ट्री, कॉमेडी आणि या सगळ्या गोंधळामागचं कारण प्रेक्षकांना नक्कीच एंटरटेन करेल. मांजराचं या संपूर्ण कथेत नेमकं काय स्थान आहे, हे आम्ही सध्या गुलदस्त्यातच ठेवलं आहे.” हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या वितरणाची धुरा एए फिल्म्सने सांभाळली आहे. येत्या १८ सप्टेंबर २०२६ रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech