कोल्हापूर : मानवी अस्तित्व, कर्माचे गूढ, मृत्यूचे अटळ चक्र आणि अनाकलनीय घटनांची मालिका यांचा रहस्यमय पट उलगडणारा ‘मृत्यूचक्र’ हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपटगृहात दाखल झाला आहे. मृत्यूच्या पलीकडे दडलेले गूढ, कर्माच्या हिशेबाचा अनाकलनीय खेळ आणि भयाची सावली यांची उत्कंठावर्धक सांगड घालत ‘मृत्यूचक्र’ प्रदर्शनानंतरही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. नुकताच ‘मृत्यूचक्र’ चित्रपटाचा प्रीमियर सोहळा कोल्हापूरमध्ये दिमाखात संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाच्या निर्मात्या प्रणाली उन्मेश वाघमोडे, दिग्दर्शक विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू-गंगावणे, कलाकार शशांक शेंडे, अक्षया गुरव, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ, अनिल रबाळे, क्रिएटिव्ह प्रोड्युसर रोहन शहा, संकलक राहुल भातणकर, प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक निशांत तवर आणि चित्रपट तसेच विविध क्षेत्रातील इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
श्री महादेव फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि अध्यांश मोशन पिक्चर निर्मित या बहुचर्चित चित्रपटाची निर्मिती प्रणाली उन्मेश वाघमोडे यांनी केली आहे, तर दिग्दर्शनाची धुरा विलास वाघमोडे आणि अनुप्रिता कडू-गंगावणे यांनी सांभाळली आहे. ‘मृत्यूचक्र’ हा केवळ रहस्य आणि थराराचा खेळ नाही, तर मृत्यू, कर्म आणि मानवी अस्तित्वाकडे वेगळ्या नजरेने पाहणारा अनुभव आहे. ‘मृत्यूचक्र’ प्रेक्षकांना केवळ घाबरवणार नाही, तर चित्रपट संपल्यानंतरही काही प्रश्न त्यांच्या मनात घोळवत ठेवेल, असा निर्माते-दिग्दर्शकांना विश्वास आहे.
या चित्रपटात सशक्त अभिनयशैली असलेले मातब्बर कलाकार असून यामध्ये शशांक शेंडे, अक्षया गुरव, पुष्कराज चिरपुटकर, आस्ताद काळे, वर्षा दांदळे, कृतिका तुळसकर, सानिका बनारसवाले, संजय शेजवळ, शलाका गाडे, शरा गायकवाड, जितेंद्र पोळ, अनिल राबाडे यांच्या भूमिका लक्षवेधी ठरत आहेत. चित्रपटाचे तांत्रिक अंगही अत्यंत भक्कम असून, चित्रपटाची मूळ कथा डॉ. सुधीर निकम यांची आहे, तर पटकथा आणि संवाद विलास वाघमोडे व डॉ. सुधीर निकम यांनी लिहिले आहेत.
रोहन शहा या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर असून जयेश मिस्त्री यांच्या यूजेएम नेटवर्क्स अँड एंटरटेनमेंट एलएलपीच्या माध्यमातून या चित्रपटाचे वितरण संपूर्ण महाराष्ट्रात केले जाणार आहे. चित्रपटाचे संगीत आणि अंगावर रोमांच उभे करणारे पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांनी दिले आहे, तर वलय मुळगुंद यांच्या गीतांना सुहास सावंत आणि शमिका भिडे यांनी आपल्या सुरेल आवाजाने सजवले आहे. चित्रपटाचे अप्रतिम छायांकन डिओपी निशांत भागवत यांनी केले असून दृश्यांची वेधक मांडणी संकलक राहुल भातणकर यांनी केली आहे. प्रोडक्शन डिझायनर म्हणून मयूर पवार, कला दिग्दर्शक कुणाल वेदपाठक, वेशभूषाकार किर्ती जंगम जोशी, रंगभूषाकार संतोष गायके यांनी जबाबदारी उत्तमरीत्या पेलली आहे.